सृजनशील चक्र (Obey Vastu Regulations)

सृजनशील चक्र (Obey Vastu Regulations)

आपली वास्तूच आपलं वर्तमान आणि भविष्य दोन्ही सुखकारक आणि उज्ज्वल बनवू शकते. मात्र आपल्याला काही वास्तूनियम पाळावे लागतात.
वास्तुशास्त्र हे नैसर्गिक नियमांवर आधारित तसेच अध्यात्माशी जुळणारं शास्त्र आहे. भारतातील एकूण 64 प्राचीन शास्त्रांपैकी हे एक शास्त्र आहे. फेंगशुई-वास्तुशास्त्रातील सिद्धान्त हे निसर्गाशी मेळ घालण्याचा सतत प्रयत्न करत असतात. आपलं शरीर ब्रम्हांडातील सर्व तत्त्वांना आकर्षित करत असतं. तसंच ग्रह, नक्षत्र यांचाही आपल्यावर प्रभाव असतो. त्यामुळे आपण निसर्गाच्या नियमांनुसार जीवन व्यतीत केलं पाहिजे.
आपण वर्तमानापेक्षाही आपल्या भविष्याबद्दल जास्त चिंतित असतो. म्हणूनच भविष्य उज्वल बनवण्यासाठी सतत वेगवेगळे प्रयत्न करत असतो. यात काही जण ग्रह-नक्षत्रांना खूश करण्याचा प्रयत्न करतात तर काही जण देव-देवतांना. पण खरं तर आपलं भविष्य सुखकर बनविणं हे आपल्याच हातात असतं. आपली ’वास्तू‘च आपलं वर्तमान आणि भविष्य दोन्ही सुखकारक आणि उज्ज्वल बनवू शकते. मात्र त्यासाठी आपल्याला काही वास्तूनियम पाळावे लागतात. कधी कधी अगदी क्षुल्लक वाटणार्‍या गोष्टीही आपलं भविष्य घडवण्यात अतिशय मोलाची कामगिरी बजावतात.

भंगाराने ताणतणाव
आपल्या दैनंदिन जीवनातील कित्येक निरुपयोगी वस्तू  ज्यांना आपण भंगार म्हणतो. हे भंगार वेळोवेळी घराबाहेर टाकलं पाहिजे. कारण भंगार सामानात अधिक प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते. घरात जेथे हे सामान टाकलेलं असतं ती जागा नकारात्मक ऊर्जेने प्रभावित असते आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. कधी कधी भंगार वस्तूसुद्धा भविष्यात कामाला येणार्‍या असू शकतात. अशावेळी या सामानासाठी वेगळी खोली करावी. ही खोली आपल्या वास्तूच्या बाहेर नैऋत्य दिशेला करावी. भंगार खोली बनवणे शक्य नसेल तर घराबाहेर नैऋत्य कोपर्‍यात खाली जमिनीवर ठेवावे. बरेचदा लोकं घराच्या छतावर भंगार जमा करून ठेवतात. असं केल्यानं व्यक्तींना मानसिक ताणतणाव होऊ शकतो. घरातील अनावश्यक वस्तू जसे, बंद पडलेलं घड्याळ, न चालणारा टी.व्ही., मिक्सर इत्यादी ताणतणावास कारणीभूत ठरतात. अशा कोणत्याही वस्तू घरात ठेवू नयेत. साफसफाई होत नाही अशा ठिकाणी अशुभ ऊर्जेचा वास असतो.

तुम्हाला तुमचं वर्तमान आणि भविष्य दोन्ही सुखकर करायचं असेल तर घरातील पाच मूलभूत तत्त्वांना त्यांच्या सृजनशील चक्राप्रमाणे स्थापित करणं गरजेचं आहे.
सृजनशील चक्र : अग्नी-पाणी-धातू-पाणी-लाकूड
विनाशकारी चक्र : पाणी-पृथ्वी-लाकूड-धातू-अग्नी

तत्त्वांचा समतोल
घर असो वा कार्यालय दोन्ही ठिकाणी ऊर्जेचा समतोल साधण्यासाठी ही पाच तत्त्वं आपल्याला मदत करतात. उदाहरणार्थ : अग्नीच्या कोपर्‍यात पाण्याचा साठा केला तर त्यामुळे घरात संकटं येणार हे उघड आहे. अनेकांच्या घरामध्ये पती-पत्नीमध्ये अगदी क्षुल्लक कारणांवरून वाद-विवाद, भांडणं होतात. या पती-पत्नीने स्वयंपाकघर तपासून पाहावं. तेथे तुम्हाला अग्नीच्या कोपर्‍यात किंवा अग्नीच्या अगदी जवळ पाणी आढळून येईल. काही घरांमध्ये मायक्रोवेव्ह ओव्हन किंवा टोस्टर फ्रीजवर ठेवलेला असतो. यामुळे घरात वादविवाद होणार हे निश्‍चित. नातेसंबंधाचा कोपरा (नैऋत्य दिशा) हा पृथ्वीतत्वाचा आहे. या कोपर्‍यात झाडंझुडुपं, वृक्ष इत्यादी ठेवलं तर त्याचा विवाहावर नक्की परिणाम होणार. कारण वृक्ष पृथ्वीचा नाश करतात. शिवाय याचे घरातील आईवर देखील बाधक परिणाम दिसून येतात. विनाशकारी तत्त्वाप्रमाणे असलेल्या तत्त्वांचे असे अनेक दुष्परिणाम असतात.
या पाच मूलभूत तत्त्वांचा समतोल साधण्यासाठी वर दिलेल्या सृजनशील चक्राप्रमाणे तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करा. कारण तुमच्या घराला तुमच्याहून अधिक कोणीही ओळखू शकत नाही.