चंद्राचा अंक 2 (Numerology Forecast Of Persons ...

चंद्राचा अंक 2 (Numerology Forecast Of Persons Having Number 2 As Birth Date)

चंद्राचा अंक 2
जन्मांक 2 असलेल्या, अर्थात कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींवर चंद्राचा प्रभाव असतो.
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक दोन असतो. दोन हा शांत आणि शीतल अशा चंद्राचा अंक आहे. सूर्यमंडळातील एक महत्त्वाचा भाग असलेल्या चंद्राला स्वत:चा प्रकाश नसला, तरी तो सूर्याचा तप्त प्रकाश शीतल करून परावर्तित करत असतो. दररोज आपला आकार, कला बदलत असतो. पूर्ण चंद्र, चंद्रकोर… अशी त्याची प्रत्येक रूपं मनाला भुरळ घालतात. चंद्राच्या प्रभावातील जन्मांक दोन असलेल्या व्यक्तीही अशाच असतात.
चंद्राप्रमाणे शांत आणि कायम प्रसन्न असणार्‍या दोन जन्मांकाच्या व्यक्ती, सहवासात येणार्‍या प्रत्येकाला आपल्या हसतमुख, मृदुभाषी, उत्साही, मनमिळाऊ आणि नर्मविनोदी स्वभावाने आनंदी करतात. संपूर्ण वातावरणातच आनंद, उत्साह भरतात. म्हणूनच या व्यक्तींभोवती कायम लोकांचा गराडा असतो. या व्यक्ती शक्यतोवर भांडणतंटे, वादविवाद, टीका करणं यापासून दूर राहत असल्यामुळे उत्तम मध्यस्थ, सल्लागार, समुपदेशक किंवा विक्रेते बनू शकतात.

उपजत कलाकार
चंद्राच्या प्रभावातील या व्यक्तींमध्ये उपजतच एक कलाकार दडलेला असतो. संधी मिळाली की, तो लगेच आपली कला सादर करतो. साहित्य, संगीत, अभिनय, चित्र, शिल्प अशा एखाद्या तरी कलेमध्ये त्यांना रुची असते. सौंदर्यदृष्टी, कल्पनाशक्ती, कलेची जाण आणि सादरीकरणाची कसब उत्तम असल्यामुळे त्या अल्पावधीत यशाचं शिखर गाठतात. असं असलं तरी, अनेक गुणांचे, कलांचे धनी असलेल्या या व्यक्ती आपला बराचसा अमूल्य वेळ स्वप्नरंजनात व्यतीत करतात. त्यामुळे प्रत्यक्ष कामासाठी त्यांना वेळ अपुरा पडतो. सतत कुणीतरी त्यांच्या सामर्थ्याची, कलागुणांची त्यांना आठवण करून द्यावी लागते, त्यांना प्रोत्साहन द्यावं लागतं.

मूड वारंवार बदलतो
दोन जन्मांक असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत आणखी एक समस्या असते, त्यांचा मूड चंद्राच्या कलांप्रमाणे वारंवार बदलत राहतो. मुळातच अतिशय संवेदनशील असल्यामुळे त्यांच्या मूडवर भोवतालच्या वातावरणाचाही परिणाम होत असतो. म्हणजे, ते स्वतःच्या आयुष्यातील समस्येमुळे पटकन चिंताग्रस्त किंवा निराश होतातच, मात्र आसपासचं वातावरण तणावग्रस्त किंवा दुःखी असेल, तर त्याचाही परिणाम लगेच या व्यक्तींवर होतो. यामुळे या व्यक्तींना रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह असे आजार होण्याची शक्यता वाढते. हे टाळण्यासाठी त्यांनी मन शांत आणि प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. नियमितपणे योगासनं आणि ध्यानधारणा यांचा सराव करायला हवा.
चंचल, लहरी स्वभाव त्यांच्या विचारांनाही अस्थिरता देतो. पटकन निर्णय घेणं किंवा घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणं, त्यांच्यासाठी कठीण होऊन बसतं. त्यांना व्यवहाराची गणितंही विशेष जमत नाहीत, त्यात बरेचदा त्यांचा मृदू स्वभाव आड येतो. शिवाय हे सहज कोणावरही विश्‍वास ठेवतात.

जन्मांक दोन असणार्‍या काही प्रसिद्ध व्यक्ती :
महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, राजीव गांधी, ओशो,
के.एल. सैगल, दिलीप कुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, आशा पारेख, शाहरूख खान, संजय दत्त, थॉमस अल्वा एडिसन, जॉन एफ. केनेडी, आंद्रे आगासी इत्यादी.