मालदीवमध्ये मौजमजा करणाऱ्या बॉलिवूड आणि टी.व्ही...

मालदीवमध्ये मौजमजा करणाऱ्या बॉलिवूड आणि टी.व्ही. स्टार्सना आता नो एन्ट्री (Now Bollywood & Tv Stars Can’t Enjoy Holidays At Their Favourite Destination, Maldives Suspends Tourists Travelling From India)

गेल्या काही दिवसांपासून मालदीव हे बॉलिवूड आणि टी. व्ही. स्टार्सचं आवडतं पर्यटन स्थळ झालं होतं. जो उठतो तो मालदीवला जातो आणि सुट्टी घालविण्याच्या बहाण्याने मौजमजा करतो, अशी अवस्था झाली होती. दिया मिर्झा, माधुरी दीक्षित, सारा अली खान, श्रद्धा कपूर, जान्हवी कपूर, आलिया भट्ट – रणबीर कपूर, टायगर श्रॉफ – दिशा पटणी असे बॉलिवूड कलाकार तिथे दाखल झाले होते. हिना खान, मौनी रॉय, सुरभि ज्योती, शेफाली जरीवाला, टिना दत्ता, आरती सिंह या टी. व्ही. तारका देखील तिथे पोहचल्या होत्या. बिकिनी घालून समुद्रकिनारी किंवा पोहण्याच्या तलावात बागडण्याचा पायंडा त्यांनी पाडला होता.

श्रद्धा कपूरचा मावस भाऊ आणि पद्मीनी कोल्हापुरेचा मुलगा प्रियांक शर्मा याने तर मालदीवमध्ये लग्न केले. त्याला बऱ्याच बड्या असामी हजर राहिल्या होत्या.

मात्र आता ही स्टार मंडळी तिथे जाऊ शकणार नाहीत. कारण करोनाचा वाढता संसर्ग पाहून मालदीव सरकारचे डोळे उघडले. आणि त्यांनी भारतीय पर्यटकांना तिथे नो एन्ट्री जारी केली आहे. आता मालदीवमध्ये आपल्या पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच तिथे पोहचले होते. पण मालदीव सरकारचे बंदीचे फर्मान जारी होताच, त्यांना सरळ घरचा रस्ता पकडावा लागला. त्याचप्रमाणे टायगर श्रॉफ आणि दिशा पटणी हेही परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.

सध्याच्या करोना संकटाच्या भयंकर परिस्थितीतून देश संक्रमण करत असताना फिल्मी व टी. व्ही. सिताऱ्यांचे मालदीवमध्ये मौजमजा करणे काही लोकांना खटकले होते. श्रुती हसन, शोभा डे, अन्नू कपूर, नवाजुद्दीन सिद्दीकी या लोकांनी महागड्या पर्यटन स्थळांवर सुट्टी एन्जॉय करणाऱ्या कलाकारांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. आपला देश करोनामध्ये  भरडला जात असताना अशा श्रीमंती पर्यटन स्थळांवर मौजमजा करणे, त्यांना शोभते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. शिवाय आपले तोकड्या कपड्यातील फोटो प्रसिद्ध करून आपण संवेदनशून्य आहोत, याचे दर्शन ते घडवत आहेत. इतकं भावनाशून्य कोणी कसं होऊ शकतं? इत्यादी प्रकारची जहाल टीका या मस्तीखोर सिताऱ्यांवर केली गेली होती. मान्यवर टीकाकारांबरोबरच समर्वसामान्य लोकांचही असंच मत होतं की, खूप पैसे खर्च करून सहलीला जाण्यापेक्षा या सिताऱ्यांनी करोनीशी झुंज देणाऱ्या लोकांना मदत केली पाहिजे. आता या मस्तीखोरांना चांगला चाप बसला आहे.