आता हिंदी भाषेच्या वादात अक्षय कुमारची उडी; तो ...

आता हिंदी भाषेच्या वादात अक्षय कुमारची उडी; तो म्हणतो- आपण एक आहोत, बदल येईल (Now Akshay Kumar Breaks The Silence On Hindi National Language : Says – We Are One, Things Will Change)

गेल्या काही दिवसांपासून हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही, यावर चित्रसृष्टीत वाद सुरू आहे. याची सुरुवात अजय देवगण आणि दाक्षिणात्य चित्रसृष्टी यांच्यामध्ये झाली. त्यात आता अक्षय कुमारने उडी घेतली आहे. दाक्षिणात्य व बॉलिवूडच्या चित्रपटांची तुलना करायची झालीच, तर त्यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या मानाने हिंदी चित्रपट कमी चालतात, यावर अक्षयने सहमती दाखवली आहे. पण तो हेही सांगतो की, लवकरच बदल येईल.

अलिकडेच एका मुलाखतीत राष्ट्रभाषा हिंदीबाबत तो बोलला की, “हा ‘पॅन इंडिया’ शब्द मला उमगलेला नाही. मात्र हिंदी चित्रसृष्टीसाठी ही अवघड वेळ आहे. सर्वच चित्रपट तिकीट बारीवर चांगला गल्ला गोळा करतील, अशी मला आशा आहे.”

धर्म आणि भाषेच्या जोरावर या एन्टरटेनमेन्ट इंडस्ट्रीला विभक्त करण्याच्या प्रयत्नांवर त्याने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘ही साऊथ इंडस्ट्री आहे, ती नॉर्थची आहे, असं कोणी बोलतं तेव्हा मला खूप राग येतो. आम्ही सारे एकच आहोत – एन्टरटेनमेन्ट इंडस्ट्री. आपण एक इंडस्ट्री आहोत, असं का नाही बोलत. प्रत्येक भाषा सुंदर आहे. त्यावर वाद घालण्यात अर्थ नाही.’

या मुद्यावर अधिक भाष्य करताना अक्षय बोलला की, “आपण इतिहासापासून काहीच शिकलो नाही, ही खेदाची गोष्ट आहे. इंग्रजांनी धर्म आणि भाषेच्या जोरावर लोकांची फाळणी केली. ब्रिटिशर्सनी केलेल्या कृत्याने आपण काहीच शिकलो नाही का? म्हणूनच आपण आज ही भाषा करतो आहोत. आपण सारे एक आहोत, हे आपण ज्या दिवशी समजू, तेव्हा गोष्टी सुधारतील.”