कार्तिक आर्यनच्या आधी या कलाकारांनाही मिळाल्या ...

कार्तिक आर्यनच्या आधी या कलाकारांनाही मिळाल्या निर्मात्यांकडून महागड्या भेटवस्तू (Not Only Karthik Aryan, These Actors Have Also Received Expensive Gifts From The Makers)

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या  ‘भूल भुलैया 2’ चित्रपटाच्या यशामुळे खूप चर्चेत आहे. पण जेव्हा या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी कार्तिकवर खुश होऊन ‘मॅकलॉरेन जीटी कार’ गिफ्ट केली तेव्हा त्या चर्चांना आणखी फोडणी मिळाली.

विशेष म्हणजे कार्तिकला भेट मिळालेली ही कार भारतात डिलेव्हरी झालेली पहिली स्पोर्टस् कार आहे. या कारची किंमत 4 कोटींच्या आसपास आहे. खरेतर कुठल्याही कलाकाराला त्याच्या निर्मात्याकडून एवढी महागडी भेटवस्तू मिळण्याची ही पहिली वेळ नाही. असे अनेक कलाकार आहेत ज्यांना महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. चला तर जाणून घेऊ कोण आहेत ते कलाकार.

अमिताभ बच्चन- रमेश सिप्पी

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करीअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे सत्ते पे सत्ता. या चित्रपटाला मिळालेले यश पाहून या चित्रपटाचे दिग्दर्शक राज सिप्पी यांनी त्यांना एक अलिशान बंगला भेट म्हणून दिला होता. तो बंगला जलसा नावाने प्रसिद्ध आहे. तसेच एकलव्य चित्रपटाच्या यशामुळे खुश होऊन त्या चित्रपटाचे निर्माते विधु विनोद चोप्रा यांनी अमिताभ बच्चन यांना रॉल्स रॉयस फॅन्टम कार भेट म्हणून दिलेली. 

अक्षय कुमार-विपुल शाह

अॅक्शन रिप्ले चित्रपटाच्या यशामुळे चित्रपट निर्माते विपुल शाह यांनी खुश होऊन अक्षयला प्राचीन काळातील रिस्ट वॉच भेट दिले होते. 1975 मधल्या या घड्याळाची किंमत 18 लाख रुपये होती.

अजय देवगन-रोहित शेट्टी

अजय देवगन आणि रोहित शेट्टी यांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले. या दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. एकदा रोहित शेट्टीने अजयच्या वाढदिवसाला पर्सनलाइज्ड स्पोर्ट्स कार भेट दिलेली. त्यावेळी त्यांच्या ऑल द बेस्ट चित्रपटाचे शूटिंग चालू होते.

रणवीर सिंह-रोहित शेट्टी

सिंबा चित्रपटाच्या शूटिंगवेळी रणवीरच्या वाढदिवसाला रोहितने एक महागडे घड्याळ भेट दिले होते.