कंगना रनौतसह या ९ कलाकारांनी वाढवलं आपलं वजन (N...

कंगना रनौतसह या ९ कलाकारांनी वाढवलं आपलं वजन (Not Only Kangana Ranaut, These 9 Bollywood Actors Also Put On Extra Kilos For A Role)

कंगना रनौत
कंगना रनौतच्या आगामी ‘थलाइवी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील जयललिता यांची भूमिका साकारणाऱ्या कंगनाच्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटात कंगना, जयललिता यांच्या तरुण वय ते वृद्धत्वापर्यंत वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. यासाठी तिने आपले २० किलो वजन वाढवले आहे
चित्रपटात जयललिता यांचा चित्रपटसृष्टीतील आणि त्यानंतर प्रभावी राजकारणी म्हणून ओळख निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून, कंगनाच्या अभिनयाचे, तसेच तिने आपल्या भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले जात आहे. परंतु केवळ कंगनानेच नव्हे, तर बॉलिवूडमधील इतरही काही कलाकारांनी आपल्या भूमिकेची गरज म्हणून स्वतःचे १० ते ३० किलोपर्यंत वजन वाढवले आहे. पाहूया यात कोणकोणते कलाकार समाविष्ट आहेत.

आमिर खान
बॉलीवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने ‘दंगल’ चित्रपटातील महावीर फोगाटच्या भूमिकेसाठी चक्क ३० किलो वजन वाढवले होते. या चित्रपटातील आमिरचा लूक प्रेक्षक पाहतच राहिले होते.


सलमान खान
आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी नेहमी सर्तक राहणाऱ्या सलमान खानने देखील ‘सुल्तान’ चित्रपटातील काही सीन्ससाठी थोडेथोडके नव्हे तर २५ किलो वजन वाढविले होते. आपल्या वयापेक्षा मोठे दिसण्यासाठी सलमानने हे परिवर्तन घडवून आणले होते.

विद्या बालन
तसं पाहिलं तर विद्या बालनला कोणी सडपातळ म्हणणारच नाही. कारण बरेचदा ती तिच्या वजनामुळेच ट्रोल केली जाते. हार्मोन्सच्या समस्येमुळे मधे काही न करताच तिचे वजन बरेच वाढले होते. परंतु विद्याने ‘द डर्टी पिक्चर’ साइन केला तेव्हा ती सडसडीत होती आणि या चित्रपटासाठी तिने आपले १२ किलो वजन वाढवले होते. या चित्रपटातील सिल्क स्मिता हे व्यक्तिमत्त्व वास्तव वाटावं यासाठी विद्याने खूप मेहनत घेतली होती आणि याच भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

रणबीर कपूर
‘संजू’ या संजय दत्तच्या बायोपिक चित्रपटात संजय दत्तसारखे हुबेहुब व्यक्तिमत्त्व साकारण्यासाठी रणबीरने अतिशय मेहनत घेतली होती. यासाठी त्याने सुरुवातीला १० किलो वजन कमी केले आणि मग संजय दत्तच्या जीवनाचा दुसरा पैलू साकारताना त्याला १५ किलो वजन वाढवावे लागलं होतं.

विकी कौशल
दहशतवाद्यांनी भारताच्या मुख्यालयावर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर गप्प न बसता भारतानं या हल्ल्याला जशास तसं दिलेलं  उत्तर म्हणजेच ‘सर्जिकल स्ट्राईक’ वर आधारित ‘उरी’ या चित्रपटात स्वतःला फिट बनवण्यासाठी विकी कौशलने १५ किलो वजन वाढवलं होतं. हा चित्रपट यशस्वी ठरल्याने विकीच्या कष्टाचं चीज झालं.

भूमि पेडणेकर
भूमि पेडणेकरने आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच खूप मोठं आव्हान स्वीकारलं होतं. तिने आपल्या पदार्पणाच्या ‘दम लगाके हईशा’ या चित्रपटामध्ये एका ८५ किलो वजनाच्या स्थूल महिलेची भूमिका केली होती, ज्यासाठी तिने ३० किलो वजन वाढवलं होतं.

फरहान अख्तर
फरहान अख्तरच्या ‘तूफान’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये फरहान एका बॉक्सरच्या भूमिकेत आहे. या भूमिकेला न्याय देण्यासाठी फरहानने अतिशय मेहनत घेतली. त्याने केवळ सहा आठवड्यांमध्ये आपलं १५ किलो वजन वाढवलं. लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होईल.

राजकुमार राव
आपल्या भूमिकेबाबत कोणतीही तडजोड न करणारा अभिनेता राजकुमार राव याने ‘बोस’ या वेबसीरीजसाठी ११ किलो वजन वाढवलं होतं. त्यासाठी त्याला अतिशय मेहनत घ्यावी लागली. एवढंच नाही तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखं दिसण्यासाठी त्याने आपलं अर्धं डोकं मुंडवून घेतलं होतं.

कृति सेनन
कृति सेननला अभिनयातील गांभीर्य लक्षात येऊन ती आता त्यासाठी मेहनत करू लागली आहे. तिच्या आगामी ‘मिमि’ या चित्रपटामध्ये ती सेरोगेट मदर म्हणून दिसणार आहे. या भूमिकेत शोभून दिसण्यासाठी कृति १५ किलो वजन वाढविण्यास तयार झाली आहे.

पुरुषांच्या इंद्रियावर कमेंट करून दिया मिर्झाने माजवली खळबळ… (Dia Mirza’s Comment On Mens Private Part; People Surprised By Tweet)