फक्त बॅडमिंटनच नाही तर या खेळातसुद्धा माहिर आहे...

फक्त बॅडमिंटनच नाही तर या खेळातसुद्धा माहिर आहे दीपिका पादुकोण (Not Only Badminton, Deepika Padukone Is Also The Champion Of This Game)

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये दीपिका पादुकोणचे नाव आघाडीवर आहे. तिने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. दीपिका दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच ती हुशार सुद्धा आहे. विशेष म्हणजे ती केवळ अभिनयातच नव्हे तर खेळात सुद्धा हुशार आहे.

दीपिका पादुकोण अभिनेत्रीसोबतच एक चांगली बॅडमिंटन खेळाडू देखील आहे. खरेतर लहान असताना तिची आपण बॅडमिंटनपटू व्हावे अशी इच्छा होती. त्यामुळे याच क्षेत्रात करिअर करण्याचा विचारही तिने केला होता. एका मुलाखतीदरम्यान दीपिकाने सांगितले होते की, ती फिजिकल ट्रेनिंग घेण्यासाठी सकाळी 5 वाजता उठायची. त्यानंतर ती शाळेत जायची. शाळेतून परतल्यावर ती बॅडमिंटन खेळायची आणि मग आपला गृहपाठ करून झोपायची.

दीपिकाचे बॅडमिंटनवरील प्रेम तुम्हाला माहीत आहे, पण ती एक चांगली बेसबॉल खेळाडू देखील आहे हे खूप कमी लोकांना ठावूक आहे. बॅडमिंटन व्यतिरिक्त दीपिका बेसबॉल देखील खेळली आहे. या खेळातही तिने अनेक राज्यस्तरीय स्पर्धा खेळल्या आहेत.

दीपिका पादुकोणचे लहानपणी अभ्यासासोबतच खेळाकडेही पूर्ण लक्ष असायचे. खेळात करिअर करण्याचा तिने मनाशी पक्का निर्धार केला होता. लहान असताना तिने चाइल्ड मॉडेल म्हणूनही काम केले आहे. 8 वर्षांची असताना पहिल्यांदा एका जाहिरातीत तिने काम केले होते. 2004 मध्ये दीपिकाने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीला तिने मॉडेल म्हणून फॅशन स्टायलिस्टच्या हाताखाली काम केले आहे.

दीपिका पादुकोणने आपल्या करीअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आणि त्यानंतर चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. शाहरुख खानसोबतचा ओम शांती ओमहा तिचा पहिला चित्रपट होता. तिने पहिल्याच चित्रपटात प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर दीपिकाने कधीच मागे वळून पाहिले नाही.

दीपिकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास 2018 मध्ये तिने अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्न केले. त्याआधी ते खूप वर्षे एकमेकांना डेट करत होते. येत्या काळात दीपिकाचा ह्रतिक रोशनसोबतचा फायटर आणि शाहरुखसोबतचा पठाण प्रदर्शित होणार आहे.