मुलांच्या अभ्यासाचा कोपरा घरातील ईशान्य दिशेला ...

मुलांच्या अभ्यासाचा कोपरा घरातील ईशान्य दिशेला (North-East Corner Of Your House Is The Best Choice For Children’s Studies)

मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने घरात कोणते महत्त्वाचे बदल करावेत?
शुभांगी, चेंबूर
मुलांच्या अभ्यासाचा कोपरा घरातील ईशान्य दिशेला असतो. अभ्यासासंबंधित सर्व वस्तू वह्या, पुस्तके, दप्तर, अभ्यासाचे टेबल, कॉम्प्युटर इत्यादी ईशान्य दिशेला ठेवावे. या दिशेला ऊर्जेचा साठा वाढवण्यासाठी व लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी आठ क्रिस्टल बॉल्सचा एक संच ठेवावा. अभ्यासाच्या जागेत लक्ष्य विचलित करणार्‍या कुठल्याही वस्तू, जसे – टि.व्ही. मॅगझीन, वगैरे ठेऊ नयेत. या दिशेला पिवळा रंग द्यावा.

घरात लग्नेच्छुक मुलं असल्यास प्रामुख्याने कोणते उपाय करायला हवेत?
निधी, बदलापूर
विवाहेच्छुक मुला-मुलींचे विवाहात वास्तुदोषामुळे अडथळे येऊ शकतात. यासाठी विवाहेच्छुक मुला-मुलींचं वायव्य किंवा ईशान्य कोपर्‍यातील रूम मध्येच वास्तव्य करावे. अविवाहितांची खोली नैऋत्येस असल्यास विवाहाला विलंब होतो. असे असल्यास घरात वडाचे पान आणून त्याला विवाहेच्छुक मुला-मुलीच्या उंचीचा दोरा मोजून पानास बांधून वायव्य दिशेला ठेवावा.

मला स्वयंपाक घरात फेंगशुईनुसार बदल करायचे आहेत. यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात?
हर्षल, सोलापूर
स्वयंपाक घरात फेंगशुईनुसार त्या स्त्रीच्या चांगल्या दिशेला पूर्व किंवा पश्चिमेला गॅसची शेगडी असावी. वास्तुच्या आग्नेय कोपर्‍यात स्वयंपाक घर असावे. उत्तर किंवा ईशान्य दिशेस पिण्याचे पाणी व सिंक असावे. आग्नेयेला उत्तरेकडे तोंड करून फ्रिज ठेवावा. पश्चिम किंवा दक्षिणेला भांड्यांचे रॅक असावे. स्वयंपाक घराच्या भिंतींना पांढरा किंवा काळा रंग लावू नये.

माझं स्वयंपाकघर आणि टॉयलेट समोरासमोर आहेत. यावर कोणता उपाय केल्यास नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडणार नाही?
गायत्री, नागपूर
स्वयंपाकघर आणि टॉयलेट समोरासमोर असल्यास टॉयलेटच्या बाहेर वरच्या बाजूला पाकुआ मिरर लावावा. टॉयलेटचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा. टॉयलेटमध्ये जाड्या मिठाचे दोन वाडगे ठेवावेत. टॉयलेटच्या उंबरठ्याला लाल रंग द्यावा, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो.

मी हल्लीच ब्यूटी पार्लर सुरू केले आहे. चांगला लाभ होण्यासाठी कोणकोणते उपाय करायला हवेत?
कुंदा, मुंबई
चांगला लाभ होण्यासाठी उत्तर दिशेला अधिक ऊर्जाशील करावे. पाण्याशी संबंधित वस्तू उत्तरेला ठेवाव्यात. पार्लरच्या मुख्य दरवाज्यासमोर चांगल्या ऊर्जेला आमंत्रित  करण्यासाठी लाफिंग बुद्धा ठेवावा. शुभ चिन्हे दरवाजावर लावावीत. पार्लरच्या आतील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी फेंगशुईच्या वस्तू ठेवाव्यात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वच्छता ठेवावी.