नोरा फतेहीची ठसकेबाज लावणी पाहिल्यानंतर माधुरील...

नोरा फतेहीची ठसकेबाज लावणी पाहिल्यानंतर माधुरीला शिट्टी वाजवण्याचा मोह आवरला नाही (Nora fatehi performs lavani dance and madhuri dixit whistles in jhalak dikhla jaa 10 watch video)

डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ही तिच्या बेली डान्ससाठी विशेष ओळखली जाते. ‘हाय गर्मी’, ‘ओ साकी साकी’ या गाण्यांवर तिने अफलातून डान्स केला. नोरा सध्या ‘झलक दिखला जा 10’ (Jhalak Dikhala Ja 10) या डान्सिंग शोमध्ये जजच्या भूमिकेत आहे. या शोच्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये तिने ठसकेबाज लावणी (Lavani) सादरी केली. तिची ही लावणी पाहून माधुरी दीक्षितलाही शिट्टी वाजवण्याचा मोह आवरला नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

कलर्स टीव्हीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या खास एपिसोडमध्ये नोराने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. नऊवारी साडी, नाकात नथ, भरजरी दागिने असा तिचा लूक आहे. या एपिसोडमध्ये अमृता खानविलकर लावणी करताना दिसणार आहे.

माधुरीला लावणीची आवड आहे. अमृताचा परफॉर्मन्स संपल्यावर माधुरीने नोरा फतेहीला स्टेजवर अमृतासह लावणी नृत्य करण्याची विनंती केली. माधुरीच्या विनंतीनंतर नोरा मंचावर येऊन अमृतासोबत ‘वाजले की बारा’ या गाण्यावर ठसकेबाज लावणी सादर करते. नोरा तिच्या अदाकारीने उपस्थितांची मनं जिंकते. नोराच्या या लावणीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

व्हिडिओमध्ये नोरा फतेहीच्या चेहऱ्यावरील भाव अप्रतिम दिसत आहेत. माधुरी दीक्षित देखील अभिनेत्रीच्या अभिनयाचा खूप आनंद घेताना दिसत आहे. नोरा फतेहीचा परफॉर्मन्स संपताच माधुरी दीक्षित जोरात शिट्ट्या वाजवते आणि आनंदाने तिला स्टँडिंग ओव्हेशन देते. नृत्य प्रकार कोणताही असो नोरा फतेही चांगले नृत्य करते.

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि नोरा फतेहीसोबत करण जोहर देखील झलक दिखला जा १० ला जज करीत आहे. अमृता खानविलकर, गश्मीर महाजनी, अली असगर, रुबिना दिलैक यांसारख्या सेलिब्रिटींनी यंदाच्या सिझनमध्ये भाग घेतला आहे. जवळपास पाच वर्षांनंतर झलक दिखला जा हा डान्सिंग शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे