कंगना रणौतचं तोडफोड झालेलं ऑफिस दुरूस्त करायला ...

कंगना रणौतचं तोडफोड झालेलं ऑफिस दुरूस्त करायला कोणीच पुढे येत नाही; कारण काय?(No Architect Ready To Build Kangana Ranaut’s Office: know What Is The Reason)

काही दिवसांपूर्वी कंगना रणौतने आपल्या तोडफोड झालेल्या ऑफिसची छायाचित्रे टाकून सगळ्यांना चकित केलं होतं. मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप करून तिच्या ऑफिसची मोडतोड केली होती. आता मात्र हेच ऑफिस दुरूस्त करण्यासाठी कोणीही आर्किटेक्ट पुढे येत नसल्याचे तिने म्हटले आहे. मुंबईमध्ये बांद्रा येथे असलेल्या या ऑफिसला हात लावण्यास कोणी तयार होत नाही, कारण त्यांना महानगरपालिकेची भिती वाटते, असा तिचा दावा आहे.

तोडफोड होऊन सहा महिने झाले तरी, आपण ऑफिस सुस्थितीत करू शकलो नाही, असं कंगनाने ट्वीटवर म्हटलं आहे. त्यामध्ये ती पुढे म्हणते, मनपा विरुध्द मी केस जिंकली आहे. आता एका आर्किटेक्टच्या सर्वेक्षणाची फाईल मला सादर करायची आहे. पण कोणी तयार होत नाही. मनपाकडून त्यांना लायसन्स रद्द करण्याच्या धमक्या मिळत आहेत. याशिवाय मनपावर तिचा आरोप असाही आहे की, कोर्टाने आदेश दिलाय्‌, तरीपण मी वारंवार फोन करून देखील मनपाचा कोणीही मूल्यांकनकर्ता अधिकारी येत नाही. कित्येक महिन्यांपासून ते माझा फोन कॉल घेत नाहीत. या सर्व प्रकरणांवरून कंगना चिंतीत आहे.

गेल्या वर्षी मनपाच्या अतिक्रमण विभागाने तिच्या ऑफिस तोडण्याचे काम केले होते. त्यामध्ये जे कर्मचारी सहभागी होते, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा विचार आपण करत असल्याचेही कंगनाने म्हटलं आहे.

गेल्या सप्टेंबर महिन्यात, अवैध बांधकाम केले, असे कारण दाखवून कंगना रणौतच्या ऑफिसचा काही भाग मनपाने पाडला होता. मुंबई हायकोर्टाने ९ सप्टेंबरला दिलेल्या आदेशावरून या कामास स्थगिती देण्यात आली. पण कोर्टाकडून तिच्या बाजूने आदेश मिळण्याच्या आधीच मनपाने तिच्या ऑफिसचा मोठा भाग पाडला होता. त्याची डागडुजी अजूनपावेतो कंगना करू शकलेली नाही.