गणेशोत्सवानंतर लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण द...

गणेशोत्सवानंतर लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण दागिन्यांचा लिलाव (News Auction Of Lalbaghcha Raja Jewelery After Ganeshotsav Festival)

संपूर्ण मुंबईकरांचे आदरस्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या (Lalbaugcha Raja 2022) दर्शनला यंदा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावर्षी कोरोनामुक्त (Corona Virus) गणेशोत्सव (Ganeshostav 2022) साजरा करण्यात आल्यामुळे मोठ्या संख्येने हजेरी लावत भाविकांनी बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी बाप्पाच्या चरणी भरभरुन वस्तू दान करण्यात आल्या. यामध्ये रोख रक्कम, सोनं-चांदीचा सामावेश आहे. गणेशोत्सवानंतर लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून दान केलेल्या या सोन्या-चांदीच्या वस्तूंचा काल गुरुवारी लिलाव करण्यात आला. लालबागच्या राजाच्या वस्तूंचा लिलाव (Lalbaugcha Raja Auction 2022 ) एकूण १ कोटी ३० लाख रुपयांना झाला.

यावर्षी लालबागच्या राजाच्या चरणी सोन्याची फुलं, सोन्याचे चरण, हार, अंगठी, मुकूट, कडे अशा वस्तू अर्पण करण्यात आल्या होत्या. चांदीचा गणपती, चांदीचा मोदक, चांदीच्या दुर्वा अशा चांदीच्या वस्तूही भक्तांनी राजाच्या चरणी अर्पण केल्या होत्या. त्याचसोबत एक हिरो होंडाची बाईक देखील दान करण्यात आली होती. यावर्षी लालबागच्या राजाच्या दानपेटीत दहा दिवसांत तब्बल पाच कोटी रुपये दान जमा झाले होते.

लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा लिलाव काल गुरुवारी पार पडला. यंदा १४ किलो ४३३ ग्रॅम चांदी आणि ३ किलो ६७३ ग्रॅम सोन्याच्या वस्तू लिलावासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या लिलावासाठी २०० भक्तांनी हजेरी लावली आणि वस्तू विकत घेतल्या. सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत हा लिलाव पार पडला.

या लिलावात सव्वा किलोचा सोन्याचा मोदक ठेवण्यात आला होता. हा मोदक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला. या मोदकाला ६० लाख ३ हजार रुपयांची बोली लावत एका महिलेने घेतला. बाप्पाला अर्पण केलेला सोन्याचा हार साडे सतरा तोळ्याचा होता. साडे आठ लाख रुपये किमतीला एका भक्ताने हा हार विकत घेतला. तर एक दुचाकीवर ६६ हजार रुपयांची बोली लावून एका भक्ताने ती विकत घेतली.