तिरुपति मंदिरातील नियमांचे उल्लंघन केल्याबाबत न...

तिरुपति मंदिरातील नियमांचे उल्लंघन केल्याबाबत नव विवाहित जोडपं नयनतारा-विग्नेशला मागावी लागली माफी, मंदिराच्या आवारात चप्पल घालून गेल्याने पाठविण्यात आली होती नोटीस (Newlyweds Nayanthara & Vignesh Shivan Issue Apology After Receiving Legal Notice For Violating Tirupati Temple Rules And Wearing Footwear Inside Temple)

टॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारानं ९ जूनला तिचा मित्र विघ्नेशशी लग्न केलं. चैन्नईतील महाबलीपुरम येथे मोठ्या जल्लोषात (Bollywood news) त्यांचं लग्न झालं. त्या लग्नाला बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी उपस्थित होते. लग्नानंतर आशीर्वाद घेण्यासाठी नयनतारा आणि विघ्नेश हे तिरुपती बालाजीला गेले होते. ते जेव्हा भगवान तिरुपतीच्या मंदिराजवळ गेले तेव्हा तिथे त्यांचा वाद झाला. त्यामुळे या जोडप्याला माफी मागावी लागली आहे. असं काय झालं होतं की, या दोन्ही सेलिब्रेटींना तेथील मंदिर प्रशासनाची माफी मागावी लागली?

त्याचं असं झालं की, भगवान व्यंकटेश्वर मंदिरातील कल्याणोत्सवात भाग घेण्यासाठी नयनतारा त्या मंदिरात गेली होती. त्यावेळी तिथं तिनं फोटोशूट केलं. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, त्यात नयनतारानं फोटोशूट करताना चप्पल घातली होती हे लक्षात आलं. आणि मंदिरात चप्पल, बुट घालून जाणं निषिद्ध आहे. तसेच तेथे फोटोशूट करण्यासही मनाई आहे.

असे असताना नयनतारा आणि विघ्नेशनं त्या नियमांचे उल्लंघन केल्यानं मंदिर प्रशासनानं नाराजी व्यक्त केली. आणि त्यांना माफी मागण्यास सांगितले. तोपर्यत ही बातमी सोशल मीडियावरुन सगळीकडे व्हायरल झाली होती. सुरुवातीला माफी मागण्यास आढेवेढे घेणाऱ्या या जोडप्याला जेव्हा कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली तेव्हा त्यांनी रीतसर माफी मागून हे प्रकरण मिटवले.

आपल्या प्रतिक्रियेमध्ये विघ्नेश शिवननं सांगितलं आहे की, या आधीही आम्ही येथे चार-पाच वेळा येऊन गेलो होतो, कारण तिरुपतीच्या मंदिरातच लग्न करण्याची आमची इच्छा होती. परंतु काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. म्हणून लग्नानंतर लगेचच जेव्हा आम्ही त्याठिकाणी दर्शनासाठी गेलो तेव्हा तेथील लोकांनी आमच्यासोबत फोटो घेण्यासाठी गर्दी केली. त्यावेळी आम्ही चप्पल आणि बुट काढले नसल्याचं आमच्या लक्षातच आलं नाही. त्यावरुन जो गोंधळ झाला. त्याबद्दल आम्ही मंदिर प्रशासनाची माफी मागतो. असे त्यानं म्हटलं आहे. भगवान तिरुपतीबाबत आमच्या मनात पूर्ण आस्था आणि श्रद्धा आहे. आम्हाला कोणाच्याही धार्मिक भावना दुखवायच्या नव्हत्या.

नयनताराच्या कामाबद्दल सांगायचं तर शाहरुखच्या जवान या चित्रपटामध्ये ती दिसणार आहे.