नवीन वर्षात शनाया कपूर ते मानुषी छिल्लरपर्यंत य...

नवीन वर्षात शनाया कपूर ते मानुषी छिल्लरपर्यंत या अभिनेत्री करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू (New Year 2022: From Shanaya Kapoor To Manushi Chillar, These Actresses Will Make Their Acting Debut Next Year)

२०२१ साल सरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. लवकरच आपण २०२२ सालाचे स्वागत करणार आहोत. नवीन वर्षात लोक नवनवीन संकल्प करत असतात, नवीन वर्षाकडून त्यांच्या अनेक अपेक्षा असतात. येणारं २०२२ हे वर्ष मनोरंजन जगतासाठीही खास असणार आहे. या वर्षात शनाया कपूरपासून मानुषी छिल्लरपर्यंत काही अभिनेत्री अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. पाहूया या अभिनेत्री कोण आहेत?

शनाया कपूर

शनाया ही अभिनेता संजय कपूरची मुलगी आहे. लवकरच ही चित्रपटामध्ये डेब्यू करताना दिसणार आहे. सध्या ती तिच्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. मागे एकदा करण जोहरनेच शनाया कपूर त्याच्या प्रोडक्शन हाऊससह या चित्रसृष्टीत पदार्पण करणार असल्याचे जाहिर केले होते. यावर्षीच्या २२ मार्चला करणने सोशल मीडियावरून शनायाच्या बॉलिवूडमधील डेब्यूबद्दलची माहिती दिली होती. तेव्हा शनाया लवकरच पुढच्या वर्षी करणच्या धर्मा प्रॉडक्शन निर्मित चित्रपटात दिसेल.

सुहाना खान

शाहरुख खानची लाडाची लेक सुहाना खान या चित्रसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय स्टार किड आहे हे सांगण्याची गरज नाही. सुहानाचे हॉट आणि बोल्ड अवतारातले फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. इन्स्टाग्रामवर देखील तिचे अनेक फॉलोअर्स आहेत, जे तिला बेहद पसंत करतात. तेव्हा सोशल मीडियावर आधीच लोकप्रिय असलेल्या सुहानाला फेमस चित्रपट दिग्दर्शिका जोया अख्यत लवकरच लॉन्च करणार आहे. येत्या वर्षात अभिनेत्री ‘द आर्चीज’ (The Archies) नावाच्या प्रसिद्ध अमेरिकन कॉमिक मालिकेच्या नेटफ्लिक्स रूपांतर मध्ये पदार्पण करणार असल्याची शक्यता आहे.

खुशी कपूर

खुशी हिंदी सिनेमाची सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी आहे. सोशल मीडियावर खुशी वरचेवर सक्रीय असते. खुशी कपूर ही सुहाना खानसोबत नेटफ्लिक्स प्रोजेक्ट ‘द आर्चीज’ शी संलग्न असल्याचे समजते. झोया अख्तर या चित्रपटाची दिग्दर्शिका आहे. सध्या तरी खुशी अभिनयाचे धडे गिरवत आहे.

नव्या नवेली नंदा

खरं तर नव्या नवेली नंदा हिची ओळख सांगण्याची गरज नाही. ही अभिनयाचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांची नात आहे. नव्या नंदा देखील झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या कॉमिक सिरिजमध्ये शाहरुख खानची लेक सुहाना खान, अन्‌ श्रीदेवीची लेक खुशी कपूर यांच्यासोबत डेब्यू करताना दिसणार आहे.

इरा खान

आमिर खान आणि रीना दत्ताची मुलगी इरा खानने (Ira Khan) यापूर्वीच ‘मेडिया’ (Medea) या प्राचीन ग्रीक शोकांतिका नाटकाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. पुढच्या वर्षी इरा अभिनय क्षेत्रात पदार्पण करताना दिसली तर आश्चर्य वाटणार नाही. इरा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अलीकडेच तिने फिटनेस कोच नुपूर शिखरे याच्याशी असलेल्या प्रेम संबधाबद्दल खुलासा केला.

मानुषी छिल्लर

साल २०१७ मध्ये मिस वर्ल्डचा सन्मान मिळवणारी मानुषी छिल्लर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. मानुषी छिल्लर अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘पृथ्वीराज’ या चित्रपटात त्याची संयोगिता म्हणून दिसणार आहे. अक्षयकुमार सोबत डेब्यू करण्याची संधी मिळाल्यामुळे मानुषी अतिशय खुश आहे. यावर्षी दिवाळीत ‘पृथ्वीराज’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता, जो चाहत्यांना आवडला होता.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम