प्रेमाचा आंबट गोड मुरांबा दुपारी चाखायला मिळणार...

प्रेमाचा आंबट गोड मुरांबा दुपारी चाखायला मिळणार (New Marathi Serial ‘Muramba’ To Open With An Afternoon Slot)

कौटुंबिक मालिकांची वेळ संध्याकाळचीच आहे. त्याला छेद देत स्टार प्रवाह १४ फेब्रुवारीपासून दुपारच्या वेळात, म्हणजे दीड वाजता ‘मुरांबा’ ही नवीन मालिका सुरू करत आहे. ‘व्हॅलेन्टाइन डे’ च्या दिवशी त्यांनी हा नवीन स्लॉट सुरू केला असून, जे प्रेमात आहेत आणि ज्यांना प्रेमात पडायचं आहे, त्यांच्यासाठी ‘मुरांबा’ ही छान गिफ्ट असेल, असं चॅनलचं म्हणणं आहे.

प्रेमाच्या या आंबट गोड कथेत नायकाची भूमिका शशांक केतकर करतोय्‌ त्याबद्दल तो म्हणाला, “अक्षय मुकादम असं या व्यक्तीरेखेचं नाव आहे. आईवर जीवापाड प्रेम करणारा आणि आजीच्या धाकाखाली वाढलेला हा मुलगा आहे. मी स्वतः आणि अक्षय हे पात्र यांच्यात एक साम्य आहे. ते म्हणजे खवय्येगिरी. स्वयंपाकघरात नवनवे प्रयोग करायला मला आवडतात. मालिकेत देखील माझं स्वयंपाकघराशी जवळचं नातं असणार आहे.”

आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना शशांक म्हणाला, “मी आणि माझी बायको प्रियांका नुकतेच आई-बाबा झालो. असं असलं तरी पूर्वीसारखंच फिट राहायचं आहे. वेटलॉस नाही, पण फॅटलॉस केला आहे.” “मी बऱ्याच दिवसांपासून रोमॅन्टिक भूमिकेची वाट पाहत होतो. प्रेक्षकांना लव्हस्टोरी आपलीशी वाटते. ‘मुरांबा’ ही अशीच आंबटगोड लव्ह स्टोरी आहे. ज्याप्रमाणे मुरांबा मुरला की त्याची चव वाढते, त्याचप्रमाणे मालिकेत नाती मुरताना तुम्ही अनुभवाल,” असेही शशांकने सांगितले.