‘हरिओम’ मध्ये फुलणार दोन रांगड्या भावांची प्रेम...

‘हरिओम’ मध्ये फुलणार दोन रांगड्या भावांची प्रेमकथा (New Marathi Film ‘Hari Om’ Depicts The Love Story Of Two Rude Brothers)

काही दिवसांपूर्वीच ‘हरिओम’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आणि तेव्हापासूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढू लागली. स्वराज्याच्या भगव्या स्वप्नातून जन्माला आलेल्या दोन वीर बंधू मावळ्यांची कथा म्हणजेच ‘हरिओम’. नव्या पिढीला प्रेरित करणाऱ्या आणि अंधारातून तिमिराकडे नेणाऱ्या ‘हरिओम’ चित्रपटाची सर्वच आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच ‘हरिओम’मधील एक प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सुरु झाले पर्व नवे’ असे या गाण्याचे बोल असून या गाण्याला रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांच्या सुरेल आवाजाची जोड लाभली आहे. अमोल कोरडे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला निरंजन पेडगावकर यांनी संगीतबद्ध केले आहे. तर या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन स्वरूप मेदरा यांनी केले आहे.

या चित्रपटात  हरी आणि ओम या दोन मावळ्यांचा रांगडा अवतार तर पाहायला मिळणारच आहे याशिवाय देशप्रेमाने झपाटलेल्या या दोन बंधू मावळ्यांची हळुवार फुलत जाणारी प्रेमकथाही पाहायला मिळणार आहे. त्यांचे हे तरल प्रेम या गाण्यातून व्यक्त होत आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात या गाण्याचे चित्रीकरण झाले असून यात हरिओम घाडगे, गौरव कदम, सलोनी सातपुते आणि तनुजा शिंदे दिसत आहेत. ओठांवर रेंगाळणारे हे गाणे प्रत्येक प्रेमीयुगुलाला आवडेल असेच आहे. श्रीहरी स्टुडीओज प्रस्तुत, हरिओम घाडगे निर्मित, आशिष नेवाळकर आणि मनोज येरुणकर दिग्दर्शित ‘हरिओम’ चित्रपट येत्या १४ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.