दर रविवारी मराठी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्र...

दर रविवारी मराठी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर साजरा करणारी नवी वाहिनी ‘प्रवाह पिक्चर’ (New Marathi channel ‘Pravah Picture’ To Launch World T.V. Premiere of Marathi Films, Every Sunday)

डिस्ने स्टारची ‘प्रवाह’ ही नवी मराठी वाहिनी सुरू झाली असून त्यावरून २४ तास नवनवे, दर्जेदार मराठी चित्रपट प्रक्षेपित होत आहेत. या वाहिनीच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंतांचे मोठे स्नेहसंमेलन लीला हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी प्रवाह पिक्चरचे कार्यक्रम प्रमुख यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. पैकी एक म्हणजे दर रविवारी नव्या मराठी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर या वाहिनीवरून साजरा करण्यात येईल.

या सोहळ्याची सुरुवात १९ जूनला होईल. ‘पावनखिंड’ या अतिशय यशस्वी, ऐतिहासिक चित्रपटाने ही सुरुवात होईल. त्यानंतर झिम्मा, कधी आंबट कधी गोड, प्रवास, ध्यानीमनी, कारखानीसांची वारी असे नवे चित्रपट दाखविले जातील. “१९ जून पासून प्रवाह पिक्चर वर मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वच कलाकार दिसतील,” अशी दुसरी हर्षभरीत घोषणा सतीश राजवाडे यांनी या प्रसंगी केली. वाहिनीच्या व्यवसाय प्रमुख संचालक नंदिनी सिंह यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

“दर रविवारी एका नव्या चित्रपटाचा प्रिमियर, म्हणजे वर्षभरात ५२ नवे चित्रपट प्रदर्शित करणे, हा अद्‌भूत प्रकार जगात पहिल्यांदाच घडत आहे,” असे गौरवोद्गार दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी काढले. तर सुबोध भावे यांनी “नामांकित चित्रपटांबरोबरच महाराष्ट्राच्या लहानमोठ्या गावातून जे चित्रपट निर्माण होतात व जे सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकत नाहीत, त्यांना प्रवाह पिक्चरने स्थान द्यावे,” अशी अपेक्षा व्यक्त केली.

या नव्याकोऱ्या वाहिनीच्या माध्यमातून प्रेक्षकांना घरबसल्या आपल्या आवडत्या मराठी चित्रपटाचा आनंद लुटता येईल. जे प्रेक्षक मराठी चित्रपटास मुकले त्यांना ते हमखास बघता येतील आणि ज्यांनी चित्रगृहात सिनेमे पाहिले, त्यांना आपला आवडलेला चित्रपट पुन्हा पाहण्याची संधी मिळेल. या वाहिनीच्या माध्यमातून चंदेरी दुनियेचं सोनेरी पर्व सुरू होत आहे; अशा प्रकारच्या भावना मराठी चित्रसृष्टीतील दिग्गजांनी व्यक्त केल्या. त्यामध्ये अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, अमृता खानविलकर, संजय जाधव, अलका कुबल, तेजस्विनी पंडित, रवि जाधव, महेश कोठारे, केदार शिंदे, अंकुश चौधरी, मृण्मयी गोडबोले, सुचित्रा बांदेकर, इत्यादींचा समावेश होता. सिद्धार्थ जाधव यांनी खुसखुशीत सूत्रसंचालन करून मजा आणली.