‘मी नर्व्हस आहे, ४८ तास झोपलेलो नाही’-चित्रपटाच...

‘मी नर्व्हस आहे, ४८ तास झोपलेलो नाही’-चित्रपटाच्या बहिष्काराबाबत आमिर खानने वर्णन केली आपली मनस्थिती (‘Nervous, ‘it’s been over 48 hours I’ve not….’ Aamir Khan addresses boycott trend days before release: ‘Agar maine kisi ka dil dukhaya hai…’)

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट उद्या म्हणजेच 11 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट अडचणीत सापडला आहे. सोशल मीडियावर यूजर्स लाल सिंग चड्ढा या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यास केवळ एक दिवस बाकी असल्यामुळे आमिर खानचे टेन्शन वाढले आहे. आमिरने पुन्हा एकदा लोकांची माफी मागितली असून आमच्यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असे म्हटले आहे. तसेच त्याने लोकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन सुद्धा केले आहे.

लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर दिल्लीला गेला होता. त्यावेळी एका कार्यक्रमात त्याने अनेक खुलासे केले. आमिरने म्हटले की, मी खूप नर्व्हस आहे, गेले ४८ तास मला झोप लागलेली नाही. माझ्या मेंदूचा भुगा झाला आहे. मी संपूर्ण रात्र ऑनलाइन बुद्धिबळ खेळण्यात किंवा पुस्तके वाचण्यात घालवतो. कदाचित मी 11 ऑगस्टनंतरच शांतपणे झोपेन. मी आणि अद्वैत्य (दिग्दर्शक) दोघेही 11 ऑगस्टनंतरच शांतपणे झोपू शकतो. आणि जेव्हा आम्हाला जाग येईल तेव्हा आम्हाला कळेल की प्रेक्षकांना आमचा चित्रपट आवडला की नाही.

सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल मौन तो़डत आमिरने म्हटले, “जर मी एखाद्या गोष्टीने कोणाचे मन दुखावले असेल, तर मी त्याबद्दल दिलगीर आहे. मला कोणाचेही मन दुखवायचे नाही. ज्यांना चित्रपट बघायचा नाही, मी त्यांच्या निर्णयाचा आदर करेन.

आमिर पुढे म्हणाला की, “अधिकाधिक लोकांनी चित्रपट पाहावा अशी माझी इच्छा आहे. आम्ही खूप मेहनत घेऊन हा चित्रपट बनवला आहे. केवळ माझ्याच नव्हे तर शेकडो लोकांच्या मेहनतीने हा चित्रपट तयार झाला आहे. त्यामुळे लोकांनाही हा चित्रपट नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

आमिर चार वर्षांनंतर ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातून पुनरागमन करत आहे. हा चित्रपट म्हणजे फॉरेस्ट गम्पचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत करीना कपूर आणि नागा चैतन्य यांच्याही भूमिका आहेत.