ऋषि कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर गेल्या होत...

ऋषि कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर गेल्या होत्या नैराश्यात, मानसोपचार तज्ज्ञांची घ्यावी लागली होती मदत (Neetu Kapoor was battling depression after Rishi Kapoor’s death, Actress shares heartbreaking experience)

नीतू कपूर (Neetu Kapoor) या आजही अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. आजही त्यांचा चाहतावर्ग अमाप मोठा आहे. विशेषत: पती ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांनी स्वत:ला ज्या प्रकारे सावरले आणि पुन्हा काम सुरु केले, त्यासाठी चाहते त्यांची प्रशंसा करताहेत. ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचे निधन होऊन दोन वर्षे झाली आहेत. मात्र त्यांच्या जाण्याने त्यांची पत्नी नीतू कपूर (Neetu Kapoor) यांच्या आयुष्यावर सर्वात मोठा परिणाम झाला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत नीतू यांनी सांगितले की, जेव्हा ऋषीजींचे निधन झाले तेव्हा त्या नैराश्यात गेल्या होत्या. यासोबत त्यांनी या सर्व गोष्टींमधून त्या कशा बाहेर पडल्या हेही सांगितले.

मुलाखतीत बोलताना नीतू म्हणाल्या, जेव्हा माझ्या पतीचे निधन झाले तेव्हा मी नैराश्यग्रस्त झाले. यातून बाहेर पडण्यासाठी मला मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्यावी लागली. यातून बाहेर पडण्यासाठी डॉक्टरांनी मला खूप मदत केली. पण मला नंतर लक्षात आले की, मी डॉक्टर मला जे सांगत आहेत, त्यापेक्षा मी अधिक मजबूत आहे.

नीतू पुढे म्हणाल्या, डॉक्टर मला ज्या गोष्टी करण्याचा सल्ला देत होते त्या सर्व गोष्टी मला आधीच माहित होत्या. त्यानंतर मी त्यांच्याकडे जाणे बंद केले. त्याच वेळी, मी कपूर साहेबांची आठवण न काढण्याचा आणि स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा सतत प्रयत्न करत राहिले. यासोबतच मी स्वतःला मजबूत करायचे ठरवले.

नीतू कपूर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, २०१३ मध्ये त्यांचा बेशरम हा शेवटचा चित्रपट आलेला होता. यामध्ये त्या मुलगा रणबीर कपूरसोबत मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. आता त्या धर्मा प्रोडक्शनच्या ‘जुगजुग जिओ’ या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट २४ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नीतू सध्या ‘डान्स दिवाने ज्युनियर’ या डान्स रिअॅलिटी शोला जज करत आहेत. ऋषी कपूर यांचे ३० एप्रिल २०२० रोजी निधन झाले. ते दीर्घकाळापासून ल्युकेमिया नावाच्या आजाराने ग्रस्त होते.