लहान वयात डॉक्टर आणि टेलरने केला विनयभंग, नीना ...

लहान वयात डॉक्टर आणि टेलरने केला विनयभंग, नीना गुप्तांचा गौप्यस्फोट (Neena Gupta’s Shocking Revealation: She Was Molested By A Doctor And Tailor As A Kid)

आपल्या बेधडक आणि रोखठोक वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. नीना गुप्ता यांचं ‘सच कहूँ तो’ हे आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे. आपल्या आत्मचरित्रातून नीना गुप्ता यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. कोवळ्या वयात त्यांना विनयभंगासारख्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता, असं सांगत नीना गुप्ता यांनी खळबळ उडवून दिली आहे. डॉक्टर आणि टेलर यांनी बालवयात विनयभंग केला होता, असा गौप्यस्फोट नीना यांनी ‘सच कहूँ तो’ या आत्मचरित्रात केला आहे.

डोळ्यांच्या डॉक्टरांच्या ‘त्या’ स्पर्शनं प्रचंड घाबरले…

बालपणी त्या त्यांच्या भावासोबत डोळे तपासण्यासाठी डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेल्या होत्या. भाऊ डॉक्टरांच्या केबिनबाहेर थांबला होता. त्या एकट्याच केबिनमध्ये होत्या. डॉक्टरांनी त्यांचे डोळे तपासण्यास सुरुवात केली. परंतु, डॉक्टरांनी अचानक त्यांना इतरत्र स्पर्श करण्यास सुरुवात केली, ज्याचा डोळ्यांशी काहीच संबंध नव्हता. डॉक्टरांचं कृत्य पाहून त्या प्रचंड घाबरल्या होत्या. घरी आल्यानंतरही तो प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोरून जात नव्हता.

टेलरचाही वाईट अनुभव…

डॉक्टर तर डॉक्टर टेलरबाबतही असाच काहीसा वाईट अनुभव आल्याचं नीना यांनी म्हटलं आहे. ड्रेसचं माप घेताना टेलरनं देखील त्यांना चुकीचा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. या गोष्टीचा त्यांना मोठा मन:स्ताप झाला होता. मात्र, सहन करण्यापलीकडे त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

आईला सांगण्याची हिंमत झाली नाही

घरी कोणी नसताना कोपऱ्यात बसून त्या अनेकदा खूप रडत. परंतु, आईला सांगायची त्यांची हिंमत होत नव्हती. तूच चुकीची आहेस, असं आई म्हणाली असती, या भीतीपोटी सगळं सहन केलं, असं नीना गुप्ता यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे.

नीना गुप्ता यांच्या आयुष्यातील कडवे सत्य

नीना गुप्ता यांनी ‘सच कहूं तो’ मध्ये बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. नीना यांनी आपल्या पुस्तकात कुटुंब, नातेसंबंध, प्रेमप्रकरण, प्रेमभंग, विवाह आणि करियरबाबत सविस्तर चर्चा केली आहे. इतकंच नाही तर नीना यांनी आपल्या पुस्तकात कुटुंबातील अनेक समस्यांचा देखील उल्लेख केला आहे. वडिलांचे कारनामे लपवण्यासाठी आईनं स्वत:ला संपवलं, असा गौप्यस्फोट नीना यांनी केला आहे. नीना गुप्ता यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक रहस्ये या पुस्तकात उघड केली आहेत, ज्यामुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत.

त्यांच्या कामाबाबत सांगायचं तर नीना गुप्ता यांचा नुकताच ‘सरदार का ग्रँडसन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत झळकले आहेत. नीना गुप्ता लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गूडबाय’ या चित्रपटात दिसणार आहेत. विकास बहल हे चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. अमिताभ आणि नीना यांच्या व्यतिरिक्त रश्मिका मंदाना आणि पावेल गुलाटी देखील या चित्रपटात दिसणार आहेत.