नीना गुप्ताच्या जीवनावर चित्रपट [Neena Gupta’s ...

नीना गुप्ताच्या जीवनावर चित्रपट [Neena Gupta’s Bio-Epic Is In Pipeline]

सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) हिच्या जीवनावर चित्रपट येणार आहे. ही माहिती खुद्द नीना गुप्तानेच एका मुलाखतीमधून जाहीर केली आहे.

काही दिवसांपूर्वी नीना गुप्ताचे ‘सच कहूं तो’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. या आत्मचरित्राच्या आधारे सदर चित्रपट निर्माण करण्याची तयारी कित्येक निर्मात्यांनी दाखवली असे नीना सांगते. ” बरेच निर्माते माझ्या जीवनावर चित्रपट तयार कऱण्यासाठी आसुसलेले आहेत ,”असं नीनाने सांगितले.

नीना गुप्ताचे आयुष्य करियर आणि खासगी जीवन यातील उतार-चढावांनी भरलेले आहे. तिचे कुटुंब, मित्र, करियर, लग्न तसेच बॉलिवूडमधील कडू-गोड अनुभव तिने आपल्या या आत्मचरित्रात मांडले आहेत. त्यामुळे तिचा जीवनपट रोचक होईल, अशी अटकळ बांधून निर्मात्यांनी तिच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली.

या चित्रपटात तुझी भूमिका साकारण्यासाठी सध्याची कोणती अभिनेत्री तुझ्या डोळ्यासमोर आहे का ?-असा प्रश्न विचारल्यावर नीना म्हणते, ” माझ्या डोळ्यासमोर कोणी नाही. या भूमिकेसाठी कोण योग्य आहे, त्याचा निर्णय त्या निर्मात्याला घेऊ देत. त्यात मी ढवळाढवळ करणार नाही किंवा कुणाचं नाव सुचविणार नाही.”

सध्या नीना गुप्ता ‘पंचायत 2’ या ओटीटी वरील वेब सिरीजमध्ये काम करते आहे. गेल्या वर्षी सरदार का ग्रॅण्डसन हा तिची भूमिका असलेला चित्रपट आला होता.