महिलांचा सन्मान ही काळाची ग...

महिलांचा सन्मान ही काळाची गरज! (Need TO Respect Women)

महिलांवर अत्याचार करणार्‍या लोकांना धडा शिकवण्याच्या हेतूने ‘मी टू’ मोहिमेची चर्चा जोरात सुरू आहे. परंतु, नुसतीच चर्चा करण्यापेक्षा संबंधित गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाही होणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

सध्या सगळीकडे ‘मी टू’ मोहिमेची चर्चा आहे. ‘मी टू’च्या व्यासपीठाचा वापर करून अनेकजणी आपल्यावरील लैंगिक अत्याचाराला वाचा फोडत आहेत. महिला अत्याचाराच्या घटनांना आळा बसवण्यासाठी फक्त ‘मी टू’ सारख्या मोहिमा राबवून उपयोग नाही, तर या मोहिमेच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा.
‘मी टू’ मोहिमेबाबत आता समाज बराच जागरूक झाला आहे. प्रत्यक्षात महिलांना अशा अत्याचारांना सामोरं जावं लागणं, हीच दुर्दैवी बाब आहे. एकीकडे आपण देवीची, शक्तीची पूजा करतो, तर दुसरीकडे एका महिलेवर अत्याचार करतो. हे मानवजातीला शोभणारं नाही. शिवाय ही मोहीम फक्त चित्रसृष्टीपुरती मर्यादित नाही. शाळेपासून अगदी आयटी क्षेत्रापर्यंत अशा गोष्टी घडत असतात. पण चित्रपट क्षेत्राला असलेल्या वलयामुळे इथल्या घटनांचा खूप गवगवा होतो. घरातही असे अत्याचार होत असतात; पण संसार वाचवण्यासाठी महिला त्याबद्दल बोलत नाहीत.

सकारात्मक बाब
‘मी टू’च्या आवाक्याबद्दल बोलायचं तर यामुळे लोक आणि विशेष करून महिला एक पाऊल पुढे टाकू लागल्या आहेत. अत्याचारांना वाचा फोडू लागल्या आहेत. ही सकारात्मक बाब म्हटली पाहिजे. ‘मी टू’ची सुरुवात घरापासूनच व्हायला हवी. घरानंतर महिला कामाच्या ठिकाणी सर्वांत जास्त वेळ असतात. तिथेही त्यांना योग्य तो सन्मान मिळायला हवा. अशा मोहिमांबद्दल माध्यमांमध्ये चर्चा झडतात, यावर कोणते उपाय करायला हवेत, महिलांनी काय करायला हवं हे, बोललं जातं. पण नुसत्या चर्चा करून ‘मी टू’चं वादळ शांत होणार नाही. हे वादळ शांत व्हावं, असं वाटत असेल तर स्त्री मानानं कशी जगेल, हे पाहायला हवं.

‘मी टू’ ही सोशल मीडियावरची मोहीम आहे. त्यावरचा तो हॅशटॅग आहे. त्यामुळे फक्त समाजमाध्यमांमधून व्यक्त झालेल्या महिलांची किती दखल घेतली जाते किंवा जाईल हा प्रश्‍न असतो. आपल्याकडे लैंगिक अत्याचाराविरोधात कायदे आहेत. अशा घटनांची गुन्हा म्हणून नोंद करता येऊ शकते. त्यामुळे महिलांनी पुढे येऊन गुन्हा दाखल करायला हवा. संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. अन्यथा, हा विषय, या घटना फक्त सोशल मीडियापुरत्या मर्यादित राहतील. बरेचदा काही दिवस त्याची हवा राहून मग सगळं काही मागे पडतं. परंतु ‘मी टू’ मोहिमेबाबत असं होता कामा नये. या मोहिमेअंतर्गत महिला अत्याचाराच्या ज्या घटना समाजमाध्यमांवर उघड होतील, त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होऊन गुन्हेगाराला शासन होणं महत्त्वाचं आहे.

‘मी टू’ या शक्तिशाली मोहिमेने पुरुषांनाही विचार करायला भाग पाडलं आहे. आपलं वागणं, बोलणं, वावर, स्पर्श, महिलांच्या नजरेला नजर देणं यातून काही चुकीचे संदेश जाऊ शकतात का, याचं भान पुरुषांनाही येणं गरजेचं आहे. ते या निमित्ताने येऊ शकेल.

– दादासाहेब येंधे