शाहरुख खानच्या ‘मन्नत’वरही पोहोचली ...

शाहरुख खानच्या ‘मन्नत’वरही पोहोचली NCB टीम! (NCB at Shahrukh Khan’s Residence)

क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर एकीकडे जामीनासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे एनसीबी मात्र वेगाने कारवाई करत आहे. आर्यन खानच्या चॅटमधून अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा झाल्यानतंर तसंच काही नावं समोर आल्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा कारवाईला वेग आला आहे. एनसीबीकडून मुंबईत वांद्रे, अंधेरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. यादरम्यान एनसीबीची टीम शाहरुख खानच्या घरी मन्नतवरही पोहोचली होती.

एनसीबीचे अधिकारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर दाखल झाले होते. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एनसीबीने यावेळी नोटीस दिली असून आर्यन खानशी संबंधित इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तपासासाठी तपास यंत्रणेकडे सादर करणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. मोबाइल फोनमधील चॅटमधून महत्वाची माहिती लागल्यानंतर इतर गोष्टींमधूनही काही खुलासे होऊ शकण्याची शक्यता एनसीबीला वाटत आहे.

अनन्या पांडेच्या घरावरही छापा

एनसीबीने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला आहे. मुंबईच्या वांद्रे येथील तिच्या घरावर हा छापा टाकण्यात आला आहे. या प्रकरणात अजून फारशी माहिती समोर आलेली नाही, पण असे मानले जाते की एनसीबीचा हा छापा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असू शकतो. अनन्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची मैत्रीण आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम राबवण्यात येत आहे.

एनसीबीने बुधवारी आर्यन खान आणि उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीचे ड्रग्ज चॅट कोर्टात सादर केले होते. त्यामध्ये ड्रग्जबद्दल चर्चा झाली होती. या चॅटच्या आधारे एनसीबीने न्यायालयाकडे आर्यनसह उर्वरित आरोपींच्या रिमांडची मागणी केली आहे. अनन्या बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. अनन्याने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

शाहरुख आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहात

बुधवारी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान आर्यन खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुसरीकडे गुरुवारी सकाळी आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला होता.

करोना काळात जेलमधील कैद्यांना नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नव्हती. पण परिस्थिती सुधारत असल्याने निर्बंध शिथील करण्यात आले असून नातेवाईकांना परवानगी देण्यात आली आहे. यानंतर शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत सुरक्षारक्षक उपस्थित होते. जवळपास १५ ते २० मिनिटांच्या भेटीनंतर शाहरुख खान तेथून रवाना झाला. यावेळी त्याने प्रसारमाध्यमांसमोर काहीही भाष्य करण्यास नकार दिला.

आर्यन खानचा जामीन का फेटाळण्यात आला?

न्यायमूर्ती व्ही व्ही पाटील यांनी आर्यन खानची जामीन याचिका का फेटाळण्यात आली याबाबत आपल्या आदेशात खालील मुद्दे नमूद केले आहेत

१. आरोपी नंबर २ (आर्यन खान ) आणि आरोपी नंबर २ ( अरबाज मर्चंट) मित्र आहेत. दोघांनी आपल्या जबाबात जवळ ड्रग्ज असल्याचं आणि सेवन केल्याचं मान्य केलंय. त्यामुळे आर्यन खानला अरबाजकडे ड्रग्ज असल्याची माहिती होती.

२. कोर्टाला दाखवण्यात आलेल्या व्हॉट्‌स ॲप चॅटवरून दिसून येतं की, आर्यन खानचे अज्ञात लोकांसोबत ड्रग्जबाबत चॅट आहेत. जास्त प्रमाणात ड्रग्ज आणि हार्ड ड्रग्जबद्दल बोलण्यात आलंय. प्राथमिक पुराव्यांनुसार आर्यन खानचे ड्रग्जशी संबंधित लोकांसोबत संबंध होते.

३. व्हॉट्‌स ॲप चॅट मधून दिसून येतं की आर्यन खानचे ड्रग्ज सप्लायर्स आणि पेडलर्ससोबत संबंध आहेत.

४. आरोपींनी संगनमताने हा गुन्हा केला.

५. आरोपी ड्रग्जशी संबंधित मोठ्या नेटवर्कचे भाग आहेत.

६. आर्यन खानची जामीनावर मुक्तता केली तर तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो या सरकारी पक्षाच्या युक्तिवादाशी सहमत आहे.

७. व्हॉट्‌स ॲप चॅटवरून आर्यन खान ड्रग्ज कारवायांशी संबंधित आहे असं दिसून येतं. जामीनावर असताना पुन्हा असा गुन्हा करणार नाही असं म्हणता येणार नाही

त्यामुळे या आरोपांना जामीन देणं योग्य ठरणार नाही.

पुढील सुनावणी २६ ऑक्टोबर रोजी

दरम्यान, आर्यन खान प्रकरणातील जामीन याचिकेवरील आजची सुनावणी स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता मंगळवार, २६ ऑक्टोबर रोजी होईल, अशी माहिती मिळाली आहे. न्यायमूर्ती एन. डब्लू. सांबरे यांच्यासमोर आर्यनची जामीन याचिका दाखल आहे.