ट्रान्सजेंडरच्या लुकसाठी दररोजचे ३ तास; नवाजुद्...

ट्रान्सजेंडरच्या लुकसाठी दररोजचे ३ तास; नवाजुद्दीनचा व्हिडिओ पाहून सर्वजण थक्क (Nawazuddin Siddiqui Was Stuck To His Makeup Chairs For 3 Hours For His Transgender Look In ‘Haddi’)

बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. तो सतत हटके भूमिका साकारुन प्रेक्षकांचं लक्ष वेधत असतो. लवकरच नवाज ‘हड्डी’ या चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनच्या आगामी ‘हड्डी’ या चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर समोर आलं होतं. यामध्ये नवाजुद्दीनला पाहून सर्वजण थक्क झाले होते. या पोस्टरमध्ये तो स्त्री वेशात दिसून आला होता.

आगामी चित्रपटात नवाजुद्दीन ट्रान्सजेंडर आणि स्त्रीची दुहेरी भूमिका साकारताना दिसून येणार आहे. आता अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने स्वतः आपल्या भूमिकेबाबत आणि त्यासाठी घ्याव्या लागलेल्या प्रचंड मेहनतीबाबत खुलासा केला आहे. सिनेमातील लेडी बॉसच्या लुकमध्ये नवाजला ओळखणंही कठीण झालं आहे. त्यानंतर आलेल्या साडीतील लुकनं तर सर्वांचं लक्ष वेधलं असून त्याच्या नव्या धाडसाचं आणि नव्या आव्हानाचं सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान नवाजचा आणखी एका फोटो समोर येतोय ज्यात ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत असलेल्या नवाज दागिन्यांनी नटलेला दिसतोय. ‘हड्डी’ सिनेमात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारण्यासाठी नवाजनं प्रचंड मेहनत घेतली. याच मेहनतीचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून अंगावर शहारे येतात.

‘हड्डी’ या सिनेमातील नवाजुद्दीनच्या ट्रान्सजेंडरच्या लुकची सर्वत्र चर्चा आहे. नवाजच्या लुकवर विशेष मेहनत घेण्यात आली आहे. त्याच्या मेकअपपासून ड्रेसिंग स्टाइल, हेअर, मेकअप, चालणं, बोलणं सगळ्यावर प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे. ट्रान्सजेंडरचं आयुष्य कसं असतं हे सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. नवाजुद्दीन आणि संपूर्ण टीमनं नवाजच्या लुकवर सर्वाधिक मेहनत घेतली आहे. शुटींगमधील सर्वाधिक वेळ त्यानं त्याच्या मेकअपसाठी खर्च केला आहे. अर्धा एक तास नाही तर तब्बल ३ तासांहून अधिक वेळ नवाज मेकअपसाठी घालवत आहे.

याआधी आपण ट्रान्सजेंडरची भूमिका का केली याविषयी नवाझुद्दीननं परखडपणे प्रतिक्रिया दिली होती. त्यात तो म्हणालाय्‌, गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडनं मला खूप काही दिले. त्या सगळ्यात माझ्या चाहत्यांचा मोठा वाटा आहे. मी चाहत्यांमध्ये कधीही भेदभाव करत नाही. पण मला नेहमीच असे वाटत आले आहे की, समाजातील अनेक गोष्टींचे प्रतिबिंब हे माझ्या भूमिकेतून मला प्रेक्षकांसमोर मांडता आले पाहिजे. तसे झाले तर मला खूप आनंद होईल. आता हड्डीच्या निमित्तानं ती संधी मला आली आहे. आणि त्या संधीचे मला सोने करायचे आहे. मला ती भूमिका करताना खूप आव्हाननंही होतं. पण मी काहीही झालं तरी त्या भूमिकेतून वेगळा विचार देणार असल्याचे नवाझुद्दीननं सांगितले आहे.