नवाजुद्दीन सिद्दीकीने पत्नी आलियाने केलेल्या आर...

नवाजुद्दीन सिद्दीकीने पत्नी आलियाने केलेल्या आरोपांवर पहिल्यांदा सोडले मौन, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट (Nawazuddin Siddiqui finally breaks silence on issues with estranged wife Aaliya, Says- She ‘only wants more money’)

नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी आलिया सिद्दीकीने त्यांच्यावर वाईट वागणूक, घरात डांबून ठेवण्याचे आणि उपासमारीचे अनेक गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नाही तर यापूर्वी दोन्ही मुलांसोबत व्हिडिओ बनवल्यानंतर आलियाने नवाजवर आरोप केला होता की, त्याने तिला घरात प्रवेश दिला नाही आणि ती दोन्ही मुलांसोबत मध्यरात्री रस्त्यावर होती. आतापर्यंत नवाजने या सर्व आरोपांवर मौन बाळगले होते, पण आता पहिल्यांदाच अभिनेत्याने पत्नीच्या आरोपांवर मौन सोडले आहे.

नवाजने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर तीन लांबलचक पोस्ट शेअर केल्या असून आलियाचे सर्व आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. नवाजने आपल्या पहिल्या पोस्टमध्ये लिहिले की, लोकांनी माझे मौन ही माझी कमजोरी मानली आहे आणि मला वाईट व्यक्तीचा टॅग देण्यात आला. माझी मुलं हा संपूर्ण तमाशा पाहतील म्हणून मी गप्प बसलो. एकतर्फी व्हिडिओ पाहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, प्रेस आणि बरेच लोक मजा घेत आहेत. पण मला काही मुद्द्यांमधून व्यक्त व्हायचं आहे…

1.आलिया आणि मी अनेक वर्षांपासून एकत्र राहत नाही. आमचा फार पूर्वी घटस्फोट झाला आहे. पण आम्ही आमच्या मुलांसाठी काही तडजोडी केल्या होत्या.

2.माझी मुलं भारतात असून गेल्या ४५ दिवसांपासून शाळेत का जात नाहीत हे कोणी सांगेल का? मुले इतके दिवस गैरहजर का आहेत, अशी विचारणा करणारे पत्र मला शाळा पाठवत आहे. माझ्या मुलांना 45 दिवसांपासून ओलीस ठेवण्यात आले आहे. त्यांना दुबईतील त्यांच्या शाळेत जाता येत नाही.

3.तिने माझ्या मुलांना चार महिने दुबईत एकटे सोडले होते आणि आता पैशाची मागणी करण्यासाठी त्यांना येथे बोलावले आहे. तिला गेल्या 2 वर्षांपासून दरमहा सुमारे 10 लाख रुपये दिले जात आहेत. माझ्या मुलांसोबत दुबईला जाण्यापूर्वी तिला दर महिन्याला सुमारे 5 ते 7 लाख रुपये द्यायचो. या पैशात शाळेची फी, वैद्यकीय खर्च किंवा माझ्या मुलांच्या इतर खर्चाचा समावेश नाही. मी तिच्या तीन चित्रपटांना फायनान्स देखील केले आहे, ज्यामध्ये मी करोडो रुपये खर्च केले आहेत. हे सर्व यासाठी की ती तिच्या उत्पन्नातील काही रक्कम साठवू शकेल आणि स्वत: ला सेटल करू शकेल, कारण ती माझ्या मुलांची आई आहे. मी मुलांसाठी मुंबईत एक भव्य सी-फेसिंग अपार्टमेंटही विकत घेतले आहे. मुलं लहान असल्याने आलियाला घरचा सह-मालक बनवले. मी माझ्या मुलांसाठी दुबईत एक अपार्टमेंटही विकत घेतले आहे, जिथे आलिया देखील अलिशान जीवन जगते. ती केवळ पैशासाठी हे सर्व करत आहे आणि म्हणूनच तिने माझ्यावर आणि माझ्या आईवर अनेक केसेस दाखल केल्या आहेत. ही तिची सवय आहे. तिने हे सर्व यापूर्वी अनेकदा केले आहे आणि पैशाची मागणी पूर्ण होताच तिने केस मागे घेतली.

4.जेव्हाही माझी मुलं भारतात सुट्टीसाठी येतात तेव्हा ते आजीसोबत राहतात. त्यांना कोणी घरातून कसे बाहेर काढू शकते. घरातून बाहेर काढताना तिने व्हिडिओ का बनवला नाही, तसं तर ती प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवते.याशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकीने अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.

5. मला ब्लॅकमेल करण्यासाठी, माझे करीअर बरबाद करण्यासाठी आणि तिच्या अवैध मागण्या पूर्ण करण्यासाठी ती असे करत असल्याने या संपूर्ण नाटकात ती माझ्या मुलांना ओढत आहे.

नवाजने आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिले की, “मी शेवटी म्हणेन की, या जगातील कोणतेही पालक आपल्या मुलांच्या अभ्यासाचे आणि भविष्याचे नुकसान करू इच्छित नाही. ते नेहमी आपल्या मुलांना सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात. आज मी जे काही कमावत आहे, ते फक्त माझ्या मुलांचे आहे आणि ते कोणीही बदलू शकत नाही. मला शोरा आणि यानी खूप आवडतात आणि मी त्यांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी काहीही करू शकतो. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे..

शेवटी नवाजने लिहिले की, प्रेम म्हणजे एखाद्याला मागे खेचणे नव्हे, तर त्याला योग्य दिशेने उड्डाण करण्यास मार्ग दाखवणे असते.