नवरात्र विशेष : देवीची शक्तिपीठे : कोल्हापूरची ...

नवरात्र विशेष : देवीची शक्तिपीठे : कोल्हापूरची महालक्ष्मी (Navratra Special: Importance Of Mahalaxmi Of Kolhapur)


-दादासाहेब येंधे
पूर्वी दक्षाने बृहस्पतीराव या नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञात शंकराला न बोलावता सर्व देवांना बोलावले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंत्रण नसतांना गेली. या यज्ञात शिवाला हबीरभाग दिला गेला नाही. त्यामुळे सतीने रागाने यज्ञात उडी घेतली. शंकराला हे कळल्यानंतर त्याने यज्ञाचा विध्वंस केला. सतीचे कलेवर हातात घेऊन महादेव त्रैलोक्यात हिंडू लागला. ही स्थिती पाहून विष्णूने सुदर्शन चक्र सोडले व सतीच्या शरीराचे 51 तुकडे ठीकठिकाणी पाडले. हे तुकडे ज्या ठिकाणी पाडले हीच देवीची 51 शक्तीपीठे आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. अशी आख्यायिका आहे. त्यात कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती, माहुरची महाकाली माता, तर वणीची सप्तशृंगी देवी ही पीठे आहेत.

कोल्हापूरची महालक्ष्मी
कोल्हापूरचे महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही. मात्र, हे देवाले शिलाहारापूर्वी कर्‍हाड येथील सिंधू सिंधुवंशी राजाने बांधले असावे असे काही संशोधक म्हणतात. कोल्हापूरच्या शिलाहारांनी आपल्याला देवीचा प्रसाद मिळाल्याचे त्यांनी लिहून ठेवले आहे, तर सातव्या शतकात राजा कर्णदेव याने हे मंदिर बांधले याचाही उल्लेख आढळतो. विद्वानांच्या मते सध्याच्या मंदिराचा जो जुना भाग आहे, त्याचे बांधकाम चालुक्याच्या उत्तर काळात झाल्याचा अंदाज आहे. कोल्हापूरच्या आजूबाजूला मिळणार्‍या काळया दगडात देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले बांधलेले आहेत. मंदिराचे शिखर व घुमट संकेश्वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले याचा उल्लेख आढळला आहे. हे देवालय एखाद्या फुलीप्रमाणे दिसते. हेमाडपंती वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणून त्याच्याकडे पाहता येते. देवळाची बांधणी एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठ्या चौकोनी दगडात केलेली असून मंदिर पश्चिमा भिमुख आहे. प्रवेशद्वारावर नगारखानाही आहे. देवळाच्या निरनिराळ्या ठिकाणी अनेक शिलालेख सापडले आहेत. मंदिरात दर शुक्रवारी देवीची मिरवणूक काढण्यात येते. कार्तिक आणि माघ महिन्यात एका विशिष्ट दिवशी सूर्यकिरणे महाद्वारातून महालक्ष्मीच्या चरणावर पोचून हळूहळू मस्तकाला स्पर्श करतात, हा चमत्कार सोहळा पाच मिनिटांपर्यंत चालतो. नवरात्रात येथे तर यात्राच भरते.