नव्या ‘रोड ट्रिप’ मालिकेत मनमौजी रॉकी एकट्याने ...

नव्या ‘रोड ट्रिप’ मालिकेत मनमौजी रॉकी एकट्याने करणार महाराष्ट्र भ्रमंती : देणार लोकप्रिय खाद्यपदार्थ आणि ऐतिहासिक स्थळांची माहिती (Naughty VJ Rocky On Solo Road Trip Of Maharashtra : Will Give Information About Popular Food And Historical Places)

‘रोड ट्रिप’ या कार्यक्रमाच्या अनेक भागातून जाड्या रॉकी आणि कडक्या मयूर यांची जोडी मौजमजा करत जागोजागीच्या, प्रांतोप्रांतीच्या खाद्यपदार्थांची, माहिती देत लोकांना छान हसवत असत. मात्र आता ‘रोड ट्रिप इन विथ रॉकी’ हा नवा कार्यक्रम सुरू होत असून त्यामध्ये मनमौजी रॉकी एकट्याने हे काम करणार आहे. अर्थात ही त्याची सोलो रोड ट्रिप आहे,

हिस्ट्री टीव्ही १८ वर रॉकीची ही भटकंती सुरू झाली असून त्यामध्ये तो महाराष्ट्रातील लोकप्रिय खाद्यपदार्थ, त्यांची समृद्ध परंपरा आणि ऐतिहासिक स्थळांची माहिती देणार आहे. हा कार्यक्रम आजपासून १० ऑक्टोबरपर्यंत चालेल.

स्वप्नांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरातून प्रवासाची सुरुवात करत रॉकी महाराष्ट्राचं निसर्गसौंदर्य पाहात फिरणार आहे. निसर्गाची मुक्त उधळण असलेले प्रदेश आणि रूचकर खाद्यपदार्थ, शिवाय समृद्ध परंपरा उलगडणारी वाटेवरची ऐतिहासिक स्थळं यांचा मिलाफ असलेला हा प्रवास प्रेक्षकांची मने जिंकेल हे नक्की.

मुंबईतल्या प्रसिद्ध श्री ठाकर भोजनालयातल्या भरगच्च थाळीवर ताव मारत, तर कधी महाबळेश्वरमधल्या ग्रेपवाइन रेस्टॉरंटमध्ये पारसी जेवणाचा आस्वाद घेत रॉकी नेहमीप्रमाणे रूचकर प्रवास करत राहील. खाद्यपदार्थांबरोबर आणखीही बरंच काही या प्रवासात पाहता येणार आहे.

युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा लाभलेली एलिफंटा लेणी, बेटावर वसलेली थेट दुसऱ्या शतकातली गुहेतली मंदिरं यांना रॉकी भेट देईल, वेण्णा तलावात शिकारामधून फेरफटका मारेल आणि साताऱ्यामधल्या प्रतापगडासारख्या ऐतिहासिक, अभेद्य मानल्या गेलेल्या किल्ल्यांवर स्वारी करेल. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत रॉकी दोन दिवस राहणार आहे. समुद्रातून वर आलेल्या सात बेटांवर वसलेलं मुंबई शहर भारताची आर्थिक राजधानी आणि बॉलिवूडपेक्षा बरंच काही आहे. लोकप्रिय समुद्रकिनारे, हेरिटेज साइट्स, भव्य ऐतिहासिक स्थळं आणि प्रसिद्ध खाऊगल्ल्या असं मुंबईत प्रत्येकासाठी काहीतरी आहे आणि रॉकीनं ते सगळं आजमावून पाहिलं. त्याच्या यादीत पहिलं होतं, ते भव्य व्हिक्टोरिया टर्मिनस आणि तिथून रॉकी मनसोक्त भटकंती आणि पंचम पुरीवाला ते कॅफे मोंदागेर, ते कॅफे मद्रासमध्ये खादाडी करत पुढे प्रवास करत राहिला.  मुंबईतलं सर्वात महत्त्वाचं ठिकाण गेट वे ऑफ इंडियावरही त्यानं थोडा वेळ घालवला आणि फेरीतून निसर्गरम्य प्रवास करत एलिफंटाकडे रवाना झाला. अर्थात त्याआधी जुहूबीचवर टिपिकल पर्यटकांप्रमाणे भटकंती करायला तो विसरला नाही.