अतरंगी पिंकी मूळची डान्सर आहे…. (Naughty ...

अतरंगी पिंकी मूळची डान्सर आहे…. (Naughty Pinky Has A Passion For Dancing)

‘पिंकीचा विजय असो’ ही नवी मालिका स्टार प्रवाह चॅनल वर सुरु झाली आहे. त्यामध्ये पिंकीची भूमिका करणारी तरुण, उत्साही अभिनेत्री शरयू सोनावणे ही मूळची डान्सर आहे. पिंकी या व्यक्तिरेखेबाबत ती म्हणाली-
“आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी पिंकीची या मालिकेत मजेदार गोष्ट आहे. खाईन तर तुपाशी म्हणणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे. तिची इंग्रजी बोलण्याची एक वेगळीच स्टाईल आहे.”

पिंकीचं पात्र आणि शरयूमध्ये काही साम्य आहे का? या प्रश्नावर शरयू म्हणाली, ” अजिबात साम्य नाही. पिंकी बिनधास्त आहे. अखंड बडबडी आहे. तर मी स्वतः खूपच शांत आहे. त्यामुळे पिंकी साकारणं हे माझ्यासाठी आव्हान आहे.”
शरयूला नृत्याची आवड आहे. ती भारत-नाटयम शिकली आहे. ड्रिमगर्ल हेमा मालिनी यांच्या यशोदा – कृष्ण या बॅलेमध्ये तिने नृत्यामधून कृष्ण साकारला आहे.

या मालिकेत युवराजची भूमिका विजय आंदळकर करतो आहे. राजकारणातील मोठं प्रस्थ असणाऱ्या गजराज धोंडे पाटील यांचा  मानी मुलगा  तो साकार करतो आहे. मान मिळवण्यासाठी युवराज काहीही करू शकतो, हे या पात्राचं वैशिष्ट्य आहे. या मालिकेची पार्श्वभूमी सातारची आहे. शूटिंग देखील त्याच परिसरात चालते. त्याविषयी विजय सांगतो, “साताऱ्यातलं वातावरण फारच छान आहे. डोंगरदऱ्यात आम्ही शूटिंग करतो. इथे कायमस्वरूपी राहणारी लोकं नशीबवान आहेत. शुद्ध हवा, घरगुती जेवण यामुळे मी शूटिंगचा मनापासून आनंद घेतो आहे. शिवाय सातारी भाषा शिकण्यासाठी मी मनापासून मेहनत घेतोय. माझ्या सातारच्या मित्रांना मी आवर्जून फोन करतो आणि सातारी भाषेत बोलतो. या भाषेत वेगळाच गोडवा आहे.”