‘मी वसंतराव’ या चित्रपटाची नाना पाटेकरने केली त...

‘मी वसंतराव’ या चित्रपटाची नाना पाटेकरने केली तोंड भरून स्तुती, म्हणतो – ‘हा चित्रपट मी ६-७ वेळा सहज पाहीन’ (Nana Patekar Has All Praise For Marathi Film ‘Me Vasantrao’, Says, ‘I Can Watch This Movie For 6-7 Times’)

ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक व अभिनेता डॉ. वसंतराव देशपांडे यांचे जीवन चितारणारा ‘मी वसंतराव’ या मराठी संगीत चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण नाना पाटेकरच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी नानाने चित्रपटाची तोंड भरून स्तुती केली.

“या चित्रपटाचे संगीत, गायन, अभिनय आणि दिग्दर्शन अप्रतिम आहेत. सर्व कलाकारांनी उत्तम भूमिका केल्या आहेत. कोणीही अनाठायी नाही. मी तोंडदेखलं बोलत नाही. परंतु हा चित्रपट इतका छान जमला आहे की, मी ६-७ वेळा तो बघू शकतो.”

या चित्रपटाची निर्मिती चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर यांनी केली असून लेखन-दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी यांनी केलं आहे. जिओ स्टुडिओज्‌ प्रस्तुत हा चित्रपट १ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

वसंतरावांची प्रमुख भूमिका, त्यांचाच गुणी नातू असलेला राहुल देशपांडेने केली असून संगीत त्यानेच दिले आहे. “राहुल हा मला मुलासारखा असून त्याने इतका अप्रतिम अभिनय केला आहे की, यंदाचे नॅशनल ॲवॉर्ड त्याला मिळायला हरकत नाही,” अशी प्रशस्ती नाना पाटेकरने दिली.

या प्रसंगी राहुल देशपांडेने चित्रपटातील गाण्यांची झलक सादर करून उपस्थितांची वाहव्वा मिळवली. स्वतः राहुल व अमेय वाघ, अनिता दाते, सारंग साठे या कलाकारांनी आपली मनोगते व्यक्त केली. निर्माते चंद्रशेखर गोखले व दर्शन देसाई यांनी ७ वर्षानंतर हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त केला.