नम्रता गायकवाडचं ३७ व्या मजल्यावरील आलिशान घर (...

नम्रता गायकवाडचं ३७ व्या मजल्यावरील आलिशान घर (Namrata Gaikwad Lives In Luxurious Home On 37th Floor)

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची तरुण अभिनेत्री नम्रता गायकवाड अतिशय आलिशान घरात राहते. मुंबईमध्ये गोरेगांव पूर्वेस असलेल्या लोढा फ्लोरेन्झा या उत्तुंग इमारतीमध्ये तिचा ३ बेडरूमचा दिमाखदार फ्लॅट आहे.

नम्रता या घरात सर्व कुटुंबियांसह, म्हणजे आई-बाबा आणि २ भाऊ यांच्यासोबत राहते.

आपलं हे नवीन घर गेल्याच वर्षी घेतलं असल्याचं तिनं आम्हाला सांगितलं. या घरात नम्रताची ही दुसरी दिवाळी आहे. या आधी ती बाजूलाच असलेल्या शेरवूड टॉवर्समध्ये राहत होती.

नम्रता गायकवाडच्या घराचे इंटिरियर अतिशय आकर्षक आहे. घराची ही सजावट आपल्याच संकल्पनेतून करण्यात आली असल्याचं तिनं सांगितलं.

“मला रंगसंगतीचं उत्तम ज्ञान आहे. रंगांबाबत मला चांगली समज आहे. त्यामुळे घरच्यांनी इंटिरियरची जबाबदारी माझ्यावर सोपवली. अन्‌ मी माझ्या पद्धतीनं, आवडीचं इंटिरियर केलं”, असं नम्रताने कौतुकाने सांगितले.

या ऐषारामी घरातील तुझी आरामाची किंवा आवडीची जागा कोणती? – असं विचारल्यावर नम्रता म्हणाली “माझ्या बेडरूमची बाल्कनी. फुरसतीचे क्षण मी इथे घालवते. या बाल्कनीमधून आरेचं जंगल, तिची वनश्री पाहण्यात मला आनंद होतो. पावसाळा-हिवाळा-उन्हाळा या तिन्ही ऋतूत ३७ व्या मजल्यावरून हे जंगल बघण्याचा आनंद अवर्णनीय आहे.”

नम्रताच्या कामकाजाबद्दल बोलायचं तर तिचे बरेच मराठी चित्रपट येऊन गेलेत.

आता दिवाळीच्या आधी तिनं २ मराठी चित्रपटांचं, तसंच ॲड फिल्मचं आणि वेब सिरिजचं शूटिंग पूर्ण केलं आहे. तिच्या २ वेब सिरिज येऊ घातल्या आहेत.

आता थिएटर्स उघडली असल्याने नम्रता गायकवाडची भूमिका असलेले २ मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.

नम्रता गायकवाडचा – मेकअप आणि हेअरस्टाईल : शीतल मठकर

छायाचित्रे : नंदू धुरंधर