कोविड रुग्णांची प्राणवायू पातळी वाढविण्याचे सोप...

कोविड रुग्णांची प्राणवायू पातळी वाढविण्याचे सोपे उपाय; सांगतेय्‌ ‘नागिन’ फेम अभिनेत्री मौनी रॉय (Nagin Actress Mouni Roy Shares Easy Steps To help Covid-19 patients breathe easier)

आपल्या हॉट आणि बोल्ड अदांनी लोकांच्या हृदयाची धडकन वाढवणारी ‘नागिन’ फेम अभिनेत्री मौनी रॉयने सोशल मीडियावर कोविड रुग्णांची प्राणवायू पातळी वाढविण्याचे सोपे उपाय सांगितले आहेत. सद्य परिस्थितीमध्ये तिच्या या पोस्टचे चाहत्यांकडून फारच कौतुक होत आहे.

सध्या संपूर्ण देशभर करोनाच्या दुसऱ्या लाटेने भिती आणि दहशतीचं वातावरण निर्माण केलं आहे. करोना काळात काय दक्षता घ्यावी याबाबत देशातील जवळपास सर्वच वैद्यकीय तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जात आहे. मनोरंजन क्षेत्रातील कलाकार मंडळींकडूनही याबाबत महत्त्वपूर्ण मदत दिली जात आहे. तातडीच्या वेळी गरजू लोकांना मदत पुरवणे, रुग्णांना करोनापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करणे, नियमांचं पालन करण्याच्या सूचना देणे, अशी महत्त्वपूर्ण कार्यं या कलाकारांनी हाती घेतली आहेत. अशातच नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉयही लोकांचे मार्गदर्शन करण्याकरिता पुढे आली आहे. तिने आपल्या श्वासावर नियंत्रण कसे ठेवता येईल याचा सोपा उपाय सांगितला आहे.

आपल्या सुंदर नजाकतींमुळे मौनी रॉय नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने सोशल मीडियावर ७ स्लाइड्‌सची एक ग्राफिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने या करोना काळात घरी राहून आपली प्राणवायूची पातळी कशी वाढवता येईल, याची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, ऑक्सिजन कमी होत आहे अशी परिस्थिती उद्‌भवून रोजच्या रोज अनेक रुग्ण जिवानीशी जात आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्रालयासह सर्व डॉक्टर्स स्वतःच्या संरक्षणासाठी प्रोनिंग करण्याचा सल्ला देत आहेत. ज्यामुळे शरीरातील प्राणवायूचं प्रमाण संतुलित राहण्यास मदत होणार आहे. मौनी रॉयने देखील याच प्रोनिंगच्या माध्यमातून लोकांना सुरक्षिततेचे धडे दिले आहेत. मौनी रॉयच्या या पोस्टमधे दिलेल्या प्रोनिंगच्या मदतीने आपल्याला प्राणवायू पातळी वाढविण्याचा सोपा उपाय पाहता येईल.

स्लाइड 1

तुमची प्राणवायूची पातळी ९४ पेक्षा खाली जात आहे आणि तुम्हाला प्राणवायू सिलेंडर्स मिळत नाही आहे, तर तुम्ही प्राणवायू मिळवण्याकरता हा उपाय करा.

स्लाइड २

प्रोनिंग ही प्राणवायू पातळी वाढविण्याची वैद्यकीयदृष्ट्या सर्वमान्य अशी पद्धती आहे.

स्लाइड ३

कोविडमुळे ज्या रुग्णांची प्राणवायू पातळी ७५ टक्क्यांवर आली होती, अशा रुग्णांनाही या पद्धतीमुळे फायदा झाला असल्याचे मौनीने सांगितले आहे. एवढेच नाही तर एका ८२ वर्षांच्या वृद्ध महिलेची पोस्टही तिने शेअर केली आहे. ज्यांनी प्रोनिंग पद्धतीचा अवलंब करून करोनावर मात केली आहे.

स्लाइड ४

त्यानंतर मौनीने फोटोंच्या मदतीने प्रोनिंग करण्याची पद्धत सांगितली आहे. त्यात तिने सांगितलंय्‌, डोकं, ओटीपोटाचा भाग आणि खाली पायाच्या पंजांजवळ उशा ठेवून पोटावर ३० मिनिटं झोपा.

स्लाइड ५

आता तशाच उशा ठेवून कुशीवर ३० मिनिटं झोपा. यात तिसरी उशी दोन पायांत घ्या.

स्लाइड ६

नंतर तीनही उशांचा पाठीला आधार देत घसरत्या स्थितीत बसा.

स्लाइड ७

दर ३० मिनिटांनी स्थिती बदलत राहा. खेळत्या हवेसाठी खिडक्या उघड्या ठेवा आणि ताज्या हवेत श्वास घ्या.

मौनी रॉयच्या या पोस्टमुळे चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत शिवाय तिच्या पोस्टला लाइक करून आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत. टीव्ही इंडस्ट्री ते बॉलीवूडपर्यंतचा पल्ला गाठणारी मौनी सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ प्रदर्शित करत असते. आणि चाहतेही तिच्या फोटोंना भरभरून प्रतिसाद देतात. तिच्या कामाबद्दल सांगायचं तर मौनी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात लवकरच दिसणार आहे.