उत्सव विजयाचा (Myths, Importance And Procedures...

उत्सव विजयाचा (Myths, Importance And Procedures For Dussehra Celebrations)

-दादासाहेब येंधे
अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरुवात झालेल्या नवरात्रीची समाप्ती दशमीच्या दिवशी दिवशी होते. घटाचं उत्थापन झालं की दसरा साजरा केला जातो. या दिवसाला दसरा किंवा विजयादशमी असे संबोधले जाते. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण शुभ मुहूर्त मानला जातो. प्राचीन काळी राजे विजयादशमीच्या मुहूर्तावर शस्त्रांची पूजा करत व मोहीमवर जात. त्यामुळे या दिवसाला सीमोल्लंघन असंही संबोधलं जातं.

दसर्‍याच्या प्रथा
विजयादशमीला काही प्रथा महत्त्वाच्या मानल्या जातात. त्याअंतर्गत सीमोल्लंघन, शमीपूजन, शस्त्रपूजा, वह्या-पुस्तके, ग्रंथ, पोथ्या यांची पूजा इत्यादी पारंपारिक प्रथा येतात. या दिवशी आपट्याच्या वृक्षाची पूजा करून त्यांची पाने तोडून आपल्या नातेवाईकांना, शेजारी पाजार्‍यांना वाटतात. जुनी भांडणं, तंटे विसरून चांगल्या विचारांचे आदान प्रदान करावं अशी उदात्त भावना ही पानं वाटण्यामागे आहे.

दसर्‍याची आख्यायिका
दसरा हा सण साजरा केला जातो. पण, तो कसा केला जातो याविषयी अनेक गोष्टी प्रचलित आहेत. दुर्गादेवीने महिषासुर या दैत्याचा वध केला व विजय प्राप्त केला म्हणून हा दिवस एक विजय उत्सव म्हणून साजरा केला जातो. घट उठवण्याआधी कुशधर्म नवमीच्या दिवशी करतात. दसरा साजरा करण्या पाठीमागचे संदर्भ आपल्याला त्रेतायुगात सापडतात. प्रभू रामचंद्रांनी दहातोंडे असणार्‍या रावणाचा वध करून विजय प्राप्त केला. त्या विजयाचा आनंद उत्सव म्हणजे ’दसरा’ सण. रावण दशासन होता. त्याच्यावर विजय मिळवला म्हणुन या दिवसाला ’दशहरा’ असं म्हटलं जातं, असाही संदर्भ मिळतो. कुबेराने इंद्राच्या सांगण्यावरून आपट्याच्या झाडांवर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. कौत्साने त्याला हव्या असलेल्या चौदा कोटी सुवर्ण मुद्रा काढून घेतल्या व उरलेल्या सुवर्णमुद्रांचं दान केले. तेव्हापासून सोने देणे किंवा सोनं लुटण्यासाठी आपट्याची पाने देण्याची प्रथा प्रचलित आहे.
महाभारतात कौरवांशी युद्ध करण्यासाठी पांडवांनी या दिवशी शमी वृक्षाच्या ढोलीत लपवलेली आपली शस्त्र बाहेर काढली होती, म्हणून शमीपूजन व शस्त्र पूजन करण्याची प्रथा पडली आहे. म्हणूनच हा दिवस पराक्रमाचे विजयाचं पूजन करण्याचा मानला जाऊ लागला. आपल्याकडे ही पूजा नवमीच्या दिवशी करतात व त्यामुळे त्या दिवसाला खंडेनवमी असेही म्हणतात.
भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे या दिवशी शेतकरी बांधव आपल्या अवजारांची पूजा करतात. तर कारागीर, कामगार आपल्या यंत्रांची पूजा करतात. संपूर्ण भारतात दसरा उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक राज्यातल्या दसरा साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. अगदी आपल्या राज्याचा विचार करायला गेलो तर दसरा साजरा करण्याच्या अनेक विविध पद्धती आपल्याला दिसतात. तळकोकणात दसरा साजरा करण्याची प्रथा वेगळी, तर विदर्भात साजरा होणारा दसर्‍याच्या प्रथेत थोडा फरक दिसून येतो. तळकोकण म्हणजे विशेषकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात घट उठल्यावर ’तरंग पूजा’ नावाचा विधी केला जातो. तरंग म्हणजे तिथल्या स्थानिक देवतांचे प्रतीक रूप असतात. हे तरंग आपल्याला गुढीची आठवण करून देतात. हा रंगोत्सव दसर्‍यापासून कोजागिरी पर्यंत चालतो. बर्‍याच भागात रावणाच्या पुतळ्याचे दहन केलं जातं. परंतु, नागपूर जवळच्या रामटेक येथे रावणाच्या पुतळ्याचे दहन न करता रावणाचा वध केला जातो. बुलढाण्यातल्या देऊळगावराजा इथे ’लाटा मंडप’ ही परंपरा आहे. मोठे-मोठे खांब असलेला मंडप उभारला जातो. अचानकपणे तो उखडण्यात येतो. अशा प्रकारे दसर्‍याच्या अनेक प्रथा आपल्याला ठिकठिकाणी बघावयास मिळतात.