चाळीशीनंतर या तपासण्या कराच! (Must To Do Tests,...

चाळीशीनंतर या तपासण्या कराच! (Must To Do Tests, After You Cross 40 Years Of Age)

वय झालं म्हणून आरोग्याकडं दुर्लक्ष न करता, निरोगी राहण्याकरिता प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी ‘उपचारापेक्षा प्रतिबंध उत्तम’ हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे.
जस जसं वय वाढत जातं, तसे शरीरास आजारी पडण्यास काही ना काही कारणं मिळत जातात. त्यातच सवयीनं आपण, आता वय झालं की रोग शरीराला लागणारच असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करत जातो. त्यामुळे रोग विनाकारण ठाण मांडून बसतात. तेव्हा वयाची चाळीशी आली की प्रत्येक स्त्री-पुरुषानं निरोगी राहण्यासाठी काही तपासण्या करून घेणं आवश्यक आहे. त्या तपासण्या कोणत्या?

हृदयाशी संबंधित तपासणी


रक्तदाब, ईसीजी, इको, ईकेजी (इलेक्ट्रोकार्डियोग्राम) आणि टीएमटी. हृदयाशी संबंधित विकारांची माहिती करून घेण्याकरिता या तपासण्या महत्त्वाच्या आहेत. चाळीशीनंतर प्रत्येक स्त्री आणि पुरुषाने इलेक्ट्रोकार्डियोग्राम केलं पाहिजे.
या व्यतिरिक्त सर्व वैद्यकीय तपासण्या देखील दर दोन-तीन वर्षांनी करत राहिल्या पाहिजेत.

रक्त तपासणी
कंप्लीट ब्लड काउंट, लीवर फंक्शन टेस्ट, फास्टिंग तसेच पोस्ट प्रैंडियल ब्लड शुगर, लिपिड प्रोफाइल थायरॉइड इत्यादी तपासण्याही दर दोन-तीन वर्षांनी केल्या पाहिजेत. तपासणीत जर काही असामान्य दिसून आलं तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
या तपासण्यांमुळे अनेक गोष्टी आपल्याला कळतात. उदाहरणार्थ – पांढर्‍या पेशी, प्लेटलेट काऊंट, किडनी
आाणि लिव्हरची स्थिती, कोलेस्ट्रॉल पातळी, थायरॉइड, अ‍ॅनिमिया, मधुमेह वा मधुमेह होण्यापूर्वीची अवस्था इत्यादी.
हे सर्व जर तपासणीत पहिल्या स्तरावर असल्याचं आढळून आलं तर औषधांनी उपचार करणे शक्य असते.

बोन मिनरल डेंसिटी (बीएमडी)
ऑस्टियोपोरॉसिस, हाडांचं जुनं फॅक्चर, स्पाइनल डिफॉर्मिटी किंवा ऑस्टियोपेनिया (बोन डेंसिटी कमी होणे) ने ग्रस्त असलेल्या स्त्री पुरुषांना ही तपासणी करून घेण्याची जरुरत असते. ऑस्टियोपोरॉसिसची समस्या महिलांना अधिक प्रमाणात असते. त्यामुळे चाळीशीनंतर दर पाच वर्षांनी ही तपासणी केली पाहिजे. आणि मोनोपॉजनंतर तर दर दोन वर्षांनी बीएमडी तपासणी केली पाहिजे.

युरीन इन्फेक्शन
लघवी करताना जळजळणं, त्रास होणं, लघवी कमी होणं वा जास्त होणं इत्यादी लक्षणं आढळल्यास युरीनची तपासणी केली जाते. वारंवार आणि बराच काळापर्यंत जर युरीन इन्फेशन होत असेल तर त्यामुळे पुढे जाऊन किडनीसंबंधी आजार होऊ शकतात. तसेच वय वाढत असताना स्त्री पुरुषांमध्ये युटीआय (युरीनरी टॅ्रक्ट इन्फेक्शन)ची समस्या वाढू लागते. संपूर्ण निरोगी असूनही स्त्री आणि पुरुषांनी दर पाच वर्षांनी युरीनची तपासणी करत राहिली पाहिजे.