क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानसह आठही आर...

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानसह आठही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, आर्यनच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी (Mumbai Court Sends Aryan Khan And 7 Others To Judicial Custody For 14 Days In Drugs Seizure At Cruise Ship)

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठही आरोपींना किला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी कोर्टाने त्यांना ७ ऑक्टोबर म्हणजेच आजपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत आज संपली. त्यानंतर त्यांना आज पुन्हा किला कोर्टात दाखल करण्यात आलं. यावेळी आर्यन खानच्या बाजूने अॅड मानेशिंदे यांनी बाजू मांडली. तर एनसीबीच्या बाजूने एएसजी अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. कोर्टात जवळपास साडेतीन ते चार तास युक्तीवाद चालला. या दरम्यान कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान हे प्रकरण आता पुढच्या विशेष कोर्टाकडे वर्ग करण्यात आलं आहे.

Aryan Khan, Judicial Custody, 14 Days In Drugs Seizure

मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये आर्यन खानसह इतर सात जणांना अटक करण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास सध्या एनसीबीकडून सुरु आहे. एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट (आर्यनचा मित्र), मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा यांना अटक केलं होतं. या सर्व आरोपींचा एनसीबी कोठडीचा कालावधी संपल्यामुळे त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी एएसजी अनिल सिंग यांनी एनसीबीची बाजू मांडली. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींचा एकमेकांशी संबंध आहे. ड्रग्ज तस्करीचे जाळे शोधण्यासाठी त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची गरज आहे. तेव्हा सर्व आरोपींची येत्या ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी वाढवावी, अशी विनंती सिंग यांनी न्यायालयाकडे केली.

तर दुसरीकडे मानेशिंदे यांनी आर्यन खान यांची बाजू मांडली. त्यांनी आर्यन खान यांच्या कोठडीत वाढ करण्याची गरज नाही. आर्यनला जामीन मंजूर करण्यात यावा, अशी न्यायालयाला विनंती केली. या सुनावणीदरम्यान एनसीबीचे वकील तसेच आर्यन खान आणि इतर आरोपीची बाजू मांडणारे वकील यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच यावेळी आर्यन खानसह इतर आरोपींनाही जामीन अर्ज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अर्जावर उद्या सकाळी ११ वाजता सुनावणी घेतली जाईल. त्याचबरोबर यावेळी एनसीबीने आपली बाजू मांडण्याचेदेखील आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आर्यन खानची आजची रात्र कोठडीतच जाणार असून उद्या सकळी अकरा वाजता कोर्टाकडून त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतली जाईल. त्यामुळे आर्यन खानला जामीन मिळणार का ? हे उद्याच समजू शकेल.