म्युकरमायकोसीस : कोविड पाठोपाठ विळखा घालणारा प्...

म्युकरमायकोसीस : कोविड पाठोपाठ विळखा घालणारा प्राणघातक रोग; प्रतिबंध कसा कराल? (MUCORMYCOSIS : Post Covid Pandemic Is Fatal; How To Prevent The New Disease?)

कोविडच्या महामारीच्या पाठोपाठ म्युकरमायकोसीस हा नवा प्राणघातक रोग जलदगतीने विळखा घालू पाहत आहे. ब्लॅक फंगस असेही या रोगास म्हटले जाते. या बुरशीजन्य आजारात रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याबरोबरच बुरशी नाकावाटे शरीरात प्रवेश करते. विशेष म्हणजे ही बुरशी डोळ्यातील पेशी व मेंदूतही प्रवेश करते. यामुळे अंधत्व येते, मृत्युही होतो. ज्या काही थोड्या लोकांना या म्युकरमायकोसीसचा प्रादुर्भाव झाला आहे; त्यांना अंधत्त्व आणि मृत्यू आलेला आहे. असे असले तरी वेळेवर उपचार केले तर रुग्ण त्यातून बरा होऊ शकतो.

हा नवा रोग कोणाला होऊ शकतो?

तसं पाहिलं तर कोविडप्रमाणेच या रोगाचे इन्फेक्शन कोणालाही होऊ शकते. पण मधुमेहींना याचा जास्त धोका होऊ शकतो. शरीरातील साखरेची पातळी वाढली तर याची शक्यता जास्त असते.

 • ज्या रुग्णांनी दीर्घकाळ स्टरॉईडस्‌चे सेवन केले आहे.
 • टॉसिलीझुमॅब सारख्या इन्युनोमॉड्युलेटर्सचे उपचार ज्यांनी जास्त प्रमाणात घेतले आहेत.
 • व्हेन्टिलेटरवर ज्या रुग्णांना ठेवले होते.
 • दीर्घ काळासाठी ज्यांनी ऑक्सिजन उपचार घेतले आहेत.
 • ज्यांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. उदा. कॅन्सर, एडस्‌ किंवा अवयव रोपण केलेले रुग्ण.

लक्षणे काय असतात?

 • चेहऱ्यामध्ये वेदना
 • एका बाजूला डोके दुखणे (अर्धशिशी).
 • नाक चोंदणे.
 • दृष्टी धुसर होणे.
 • एका नाकपुडीतून रक्त वाहणे.
 • दात दुखणे किंवा दात हलू लागणे.
 • चेहरा सुजणे किंवा डोळ्यांभोवती सूज येणे.
 • डोळ्यांना झापड येणे.

उपचार कसे करावेत?

 • मधुमेह ताबडतोब नियंत्रणात आणा.
 • कान – नाक – घसा तज्ज्ञांचा त्वरेने सल्ला घ्या.
 • वरील लक्षणे दिसताच त्वरीत प्रशासनाला, डॉक्टरना कळवा.
 • टूथब्रश बदला. टंग क्लीनर बदला आणि गरम पाण्याच्या गुळण्या दिवसातून एकदा तरी करा.
 • शरीराची निगा नीट राखा.

काय करू नये?

 • सौम्य लक्षणे दिसली तरी दुर्लक्ष करू नका.
 • लक्षणे दिसली तर घरगुती उपचार करू नका.
 • स्टरॉईडस्‌ किंवा इतर औषधे डॉक्टरी सल्ल्याशिवाय घेऊ नका. स्वतःच स्वतःचे डॉक्टर बनू नका.
 • लक्षात ठेवा, वेळेवर उपचार केलेत तर तुमची दृष्टी आणि जीव वाचू शकतो!

म्युकरमायकोसीस संबंधी वरील मौलिक माहिती मुंबईच्या डॉ. आर. एन. कूपर हॉस्पिटलने प्रसारित केली आहे.