मौनी रॉय आणि सूरज नांबियार अडकले लग्नाच्या बंधन...

मौनी रॉय आणि सूरज नांबियार अडकले लग्नाच्या बंधनात, मल्याळम् पद्धतीने केले लग्न… (Mouni Roy Ties The Knot With Suraj Nambiar)

छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मौनी रॉय हिचे बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्न झाले आहे. आज सकाळी गोव्यात मोजके नातलग आणि काही फ्रेंड्‌सच्या उपस्थितीत दोघांचं लग्न पार पडलं आहे. मौनी आणि सुरज यांचं लग्न मल्याळम परंपरेने झालं आहे. त्यांच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

मौनीने लग्नात पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून तिला लाल रंगाची बॉर्डर आहे. आणि गळ्यात सोन्याचे दागिने घातले असून तिचा हा ब्राइडल लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तर दुसरीकडे सुरजने सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. दोघंही या पेहरावामध्ये सुंदर दिसत आहेत.

लग्नाआधी होणारे सगळे कार्यक्रम देखील गोव्यातच झाले आहेत. मौनी आणि सुरजच्या हळदी आणि मेहंदीचे फोटो या आधीच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यांच्या प्रीवेडिंग कार्यक्रमांमध्ये मंदिरा बेदी, अर्जुन बिजलानीसोबत आणखी बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.

मौनी रॉय आणि सूरज नांबियार २०१९ पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दुबईच्या नाईट क्लबमध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने दोघे पहिल्यांदा भेटले. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली अन्‌ नंतर प्रेम झाले. पण तो त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे बोलला नाही. दोघांनीही अधिकृत निवेदन जारी करून लग्नाबद्दल सांगितले नव्हते. सूरज हा दुबईत बँकर आणि व्यापारी असून तो तेथेच राहतो.