टीव्हीवरील नागिन मौनी रॉय आहे अलिशान अपार्टमेंट...

टीव्हीवरील नागिन मौनी रॉय आहे अलिशान अपार्टमेंट, महागड्या गाड्यांची मालकीण, जाणून घ्या किती आहे अभिनेत्रीची संपत्ती (Mouni Roy is The Owner of Luxurious Apartment and Luxury Vehicles, Know How Much Actress Earns)

टीव्हीवरील सुंदर नागिन मौनी रॉय ही अशी एक अभिनेत्री आहे, जी केवळ छोट्या पडद्यावरच नाही तर मोठ्या पडद्यावरही तिने आपले खास स्थान निर्माण केले आहे. मौनीने 2007 मध्ये लोकप्रिय टीव्ही मालिका ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ मधून आपल्या अभिनयातील कारकिर्दीची सुरुवात केली. या मालिकेमध्ये तिने कृष्णा तुलसीची भूमिका साकारली होती. यानंतर मौनी ‘जरा नच के देखा’मध्ये दिसली, या रिअॅलिटी शोमध्ये तिने सर्वांना दाखवून दिले की ती केवळ उत्तम अभिनेत्रीच नाही तर एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी मौनी रॉय अनेक चित्रपटांमध्येही दिसली आहे.आपल्या मेहनतीने मौनीने आलिशान अपार्टमेंट आणि महागड्या गाड्या खरेदी केल्या. 

टीव्ही इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यानंतर मौनी रॉयने ‘देवों के देव महादेव’ या पौराणिक मालिकेत सतीची भूमिका साकारली.या भूमिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. यानंतर तिने एकता कपूरच्या ‘नागिन 1’ आणि ‘नागिन 2’ शोमध्ये सुंदर इच्छाधारी नागिन बनून सर्वांची मने जिंकली. छोटय़ा पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर मौनीला बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्सही येऊ लागल्या. मौनीने अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. सध्या ती ‘ब्रह्मास्त्र’मधील नकारात्मक भूमिकेमुळे चर्चेत आहे.

सध्या मौनी रॉयची गणना सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. टीव्हीवर मालिकांमध्ये पाहूणी म्हणून येणे असो किंवा म्युझिक व्हिडीओमध्ये काम करण्याची ऑफर असो, अभिनेत्रीला त्यासाठी भरघोस रक्कम दिली जाते. याशिवाय, जेव्हा ती मालिकांमध्ये काम करत होती, तेव्हाही तिचे नाव टीव्हीच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये होते.

मौनी रॉयचे मुंबईत एक आलिशान अपार्टमेंट आहे, त्या अपार्टमेंटची किंमत 2 कोटी आहे. पांढर्‍या थीमला अनुसरून तिने आपल्या घराचा लूक साधा पण सुंदर ठेवला आहे. याशिवाय तिने अंधेरीतील एका बिल्डिंगमध्ये दोन फ्लॅट्सही खरेदी केले आहेत, त्यानंतर सूरज नांबियारशी लग्न करण्यापूर्वी तिने मुंबईत आणखी एक मोठे घर घेतले होते.

आलिशान घरात राहणाऱ्या मौनी रॉयकडे आलिशान गाड्याही आहेत. मौनीला मर्सिडीज गाडी खूप आवडत असल्याचे सांगितले जाते. तिच्याकडे मर्सिडीज GLS 350D आहे. त्या गाडीची किंमत 1.35 कोटी रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे 67 लाख रुपयांची मर्सिडीज-बेंझ ई-क्लास देखील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मौनी रॉयची एकूण संपत्ती 40 कोटी रुपये आहे आणि तिचा पती सूरज नांबियार एकूण संपत्ती 50 कोटी रुपयांचा मालक आहे.

मौनी एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्यासाठी सुमारे 40 लाख रुपये आकारते, तर आयटम नंबरसाठी ती फी आणखी वाढते. मौनी एका चित्रपटात काम करण्यासाठी एक कोटी रुपये घेते. याशिवाय ती टीव्ही शो, चित्रपट, जाहिराती आणि सोशल मीडिया ब्रँड प्रमोशनच्या माध्यमातून दर महिन्याला भरपूर कमाई करते. ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’ शोमध्ये परीक्षक म्हणून काम करण्यासाठी ती प्रत्येक एपिसोडसाठी 6 लाख रुपये फी घेत आहे. ‘नागिन’मध्ये मौनी एका दिवसासाठी 2 लाख रुपये फी घेत होती.