मौनी रॉय लग्नाच्या बोहल्यावर : याच महिन्यात करण...

मौनी रॉय लग्नाच्या बोहल्यावर : याच महिन्यात करणार उद्योगपतीशी लग्न (Mouni Roy is getting married with this businessman)

दुबईस्थित उद्योगपती सूरज नांबियारसोबत मौनी रॉयचे नाव बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आपण पाहिलेले आहेत. मौनीच्या त्यासाठीच वरचेवर दुबईमध्ये फेऱ्या असायच्या. मात्र आता २७ जानेवारीला ती गोव्यात लग्नाच्या बोहल्यावर चढणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. दुबईतील प्रसिद्ध उद्योगपती बँकर सूरज नांबियारसोबत ती लग्न करत आहे. लोकांना निमंत्रणं देण्याबरोबरच त्यांच्याकडे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र असल्याची ती खात्री करून घेत आहे.

मौनी आणि सूरज खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. सूरज हा मुळचा बेंगळुरूच्या जैन कुटुंबातील आहे, तर मौनी पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यातील आहे. दोघांच्या मैत्रीचे प्रेमात कधी रुपांतर झाले हे दोघांनाही कळले नाही. आता ते त्यांच्या प्रेमसंबंधांना लग्नाच्या पवित्र बंधनात बांधण्यास चालले आहेत. आधी मौनीला दुबईत लग्न करायचे होते, पण नंतर तिने डेस्टिनेशन वेडिंगसाठी तिची आवडती जागा गोवा निवडली. लग्नात येणारे पाहुणे आणि इतर सर्व गोष्टींकडे ती वैयक्तिकरित्या लक्ष देत आहे.

हे लग्न वागातोर बीच येथील डब्ल्यू फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये होणार असल्याचे बोलले जात आहे. मागे मौनी याच ठिकाणी तिच्या मैत्रिणी आणि खास मित्रांसोबत बॅचलर पार्टी एन्जॉय करताना दिसली होती. अतिशय मजेशीर संस्मरणीय अशी ती पार्टी होती.

लग्नासाठी बोलावण्यात आलेल्या पाहुण्यांमध्ये मंदिरा बेदी, एकता कपूर, करण जौहर, आशका गोरोडिया, मनीष मल्होत्रा इत्यादींची नावं निश्चित आहेत. शिवाय सर्व उपस्थितांकडे दोन्ही लसीकरणाचे सर्टिफिकेट असणं गरजेचं असल्याचंही तिनं म्हटलं आहे. लग्नसमारंभामध्ये करोनाच्या सर्व नियमांचं पालन केलं जाणार असल्याचं तिनं स्पष्ट केलं आहे.

मौनी रायला लग्नाबरोबरच तिच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागून राहिली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे पुढेच जात आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्यासोबत मौनी दिसणार आहे. यात तिची भूमिका काहीशी नकारात्मक आहे, तरीही तिला तिच्या भूमिकेबाबत पूर्ण विश्वास आहे. या आधी तिचा ‘लंदन कॉन्फिडेंशियल’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. याशिवाय अधूनमधून मौनी व्हिडिओ अल्बम आणि गाणी करत राहते. जुबिन नौटियालसोबतचे दिल गलती कर बैठा… हे गाणं तिचं विशेष गाजलं. या गाण्यातील मौनीचं सौंदर्य आणि दोघांमधील केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली.

सद्य परिस्थितीत देशभरात करोना आणि ओमिक्रॉनच्या केसेस समोर येऊ लागल्या असल्यामुळे मौनीच्या लग्नात किती जण हजर राहू शकतील ते आताच सांगता येणार नाही. परंतु सरकारी नियमांत राहून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडण्याची शक्यता आहे.