कोहिनूर हिरा आता जगन्नाथ देवस्थानाचा असल्याचा द...

कोहिनूर हिरा आता जगन्नाथ देवस्थानाचा असल्याचा दावा (Most Precious Diamond Kohinoor Belongs To Lord Jagannath : Claims The Puri Temple)

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय कालवश झाल्यापासून त्यांच्या मुकुटात असलेल्या अति मौल्यवान कोहिनूर हिऱ्याच्या स्मृती जागवत, चर्चा झडू लागल्या आहेत. हा कोहिनूर हिरा, भारतात परत आणण्यासाठी आग्रह धरला जात आहे.

त्या निमित्ताने १०५ कॅरटचा हा मूळ भारतीय हिरा नेमका आपल्या देशात कसा मिळाला व त्याचा इतिहास काय याबाबतचे औत्सुक्य पुन्हा एकवार जागृत झाले आहे. परवाच्या दिवशी आम्ही याच ठिकाणी दिले होते की, कोहिनूर हिरा आंध्र प्रदेशातील गुंटूर गावाजवळ, १३ व्या शतकात, काकतीय राजवंशाच्या काळात सापडला होता. मात्र आता ओडिशा राज्यातील एका सामाजिक-सांस्कृतिक संस्थेने त्याचे मूळ आपल्या राज्यात असल्याचा दावा केला आहे. कोहिनूर हिरा हा भगवान जगन्नाथ यांचा म्हणजे देवस्थानाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

निव्वळ दावा करूनच ही मंडळी थांबली नाहीत, तर सदर हिरा ब्रिटनमधून जगन्नाथ पुरी येथे परत आणावा, अशी मागणी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे. पुरीच्या जगन्नाथ सेनेचे निमंत्रक प्रियदर्शन पटनायक यांनी राष्ट्रपतींना या संदर्भात तसे निवेदन दिले आहे. त्यात ते म्हणतात, ‘हा हिरा भगवान जगन्नाथांचा आहे. कृपया आपण तो भारतात परत आणण्यासाठी पंतप्रधानांना सांगावे. कारण पंजाबचे महाराज रणजित सिंह यांनी भगवान जगन्नाथांना तो अर्पण केला होता.’

जगातील सर्वात मौल्यवान रत्न असलेला हा हिरा सुमारे २० कोटी डॉलर्स किंमतीचा असल्याचे मानले जाते. तो भारतात परत आणण्याच्या वल्गना आपल्याकडील अनेक राजकीय नेत्यांनी वेळोवेळी केल्या होत्या. परंतु ब्रिटीश सरकारने तो परत करण्याची शक्यता नाकारली आहे.