पावसाळ्यात राहा निरोगी, करु नका या चूका (Monsoo...

पावसाळ्यात राहा निरोगी, करु नका या चूका (Monsoon Health Tips : Easy Home Remedies To Avoid Getting Sick During The Monsoon Season)

कडक उन्हामुळे त्रासलेले आपण सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. पाऊस सुरु झाला की वातावरणात गारवा वाढतो नि आपल्याला हायसे वाटते. परंतु पावसाने वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते तर दुसरीकडे आजार पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पावसाळ्यात अनेक जण आजारी पडतात. या मौसमात निरोगी राहण्यासाठी काही गोष्टींचे नियमन करणे आवश्यक आहे.

१) बाहेरील अन्न सेवन करू नये

पावसाची बरसात झाल्याने वातावरण गारवा येतो नि आपल्या जिभेचे चोचले सुरू होतात. आपल्याला गरमागरम भजी किंवा समोसे खावेसे वाटतात. परंतु, तुम्हाला आजारांपासून दूर राहावयाचे असल्यास या पदार्थांपासूनही दूर राहावं लागेल. पावसाळ्यात शक्यतो पाणीपुरी, भेलपूरी, चाट, भज्या आणि इतर रस्त्यावरील पदार्थ खाण्याचे टाळाच. याशिवाय उघड्यावर मिळणारी कापलेली फळं, ज्यूस, लिंबूपाणी यांपासूनही दूर राहणे गरजेचे आहे.

२) आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा

आपल्या दररोजच्या जेवणात ताज्या हिरव्या भाज्यांचा समावेश करा. यामुळे पावसाळ्यातही तुम्ही फिट राहाल. परंतु वापरण्यापूर्वी भाज्या स्वच्छ धुऊन घ्यायला विसरू नका. विशेषतः फ्लॉवर, कोबी, पालक इत्यादी. कारण पावसाळ्यात या भाज्यांमध्ये माती आणि किडे असतात. या भाज्या गरम पाण्याने स्वच्छ धुऊन मगच वापरा. यामुळे जिवाणू आणि किडेही मरतील.

३) भिजल्यास लगेच आंघोळ करा

पावसात तुम्ही भिजला असाल तर इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी घरी आल्यानंतर लगेचच छान आंघोळ करा. तसेच ओल्या अंगाने एसीजवळ जाऊ नका नाहीतर व्हायरल ताप आणि सर्दी, खोकला होऊ शकतो.

४) मासे खाऊ नका

पावसाळ्यात मासे आणि कोलंबी शक्यतो खाऊ नका. या मौसमात माशांचे वेगाने प्रजनन होत असते. त्यामुळे तुम्ही मासे घेतले तरी ते ताजे असल्याची खात्री करून मगच घ्या. नाहीतर तुम्हाच्या पोटाला इन्फेक्शन होऊ शकते.

५) आर्द्रता राखा

वातावरणात गारवा असल्याने पावसाळ्याच्या दिवसात तहान कमी लागते. परंतु शरीरास आर्द्र ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक असते. पाणीही गरम करून किंवा प्युरीफाई केलेलेच प्यावे. नाहीतर जुलाब, अतिसार यांसारखे आजार व्हायला वेळ लागणार नाही. पावसाळ्यात कॉफी जास्त प्रमाणात पिऊ नये, कारण कॉफी शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करते.

६) घर स्वच्छ आणि किटाणूरहित ठेवा

घरामध्ये झुरळं, किटक, डास झाले असल्यास पावसापूर्वीच पेस्ट कंट्रोल करून घ्या. तसेच प्लंबरला बोलावून घरात कुठे पाणी गळत असेल वा जुन्या पाईपना गंज लागली असेल तर ते बदलून घ्या. कारण त्या ठिकाणी किटाणू आणि जिवाणू आपलं घर करतात नि त्यामुळे मलेरिया आणि डेंग्यू सारखे आजार होऊ शकतात.

पावसाळ्यात खालील गोष्टींकडे विशेष लक्ष असू द्या

७) भरपूर प्रथिने मिळतील असा समतोल आहार घ्या.

८) तळलेले स्नॅक्स खायचे टाळा.

९) पावसाळ्यात ताप येणं ही सामान्य बाब आहे. परंतु ताप दोन दिवसांहून अधिक राहिला तर दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांकडे जा.

१०) कच्चं आणि थंड काहीही खाऊ नका, त्याऐवजी गरम आणि शिजवलेले अन्न खा, सूप पिण्याचा पर्याय उत्तम आहे.

११) चॉपिंग बोर्ड आणि जेवण बनवितो ती जागा स्वच्छ ठेवा.

१२) जेवण बनवताना आणि वाढताना हात स्वच्छ करून घ्या.

१३) जेवण झाकून ठेवा.

१४) या मौसमात सीफूड खाऊ नका.

१५) कोणतंही फळ खाण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्या.

पावसाळ्यातील आजारांवर घरगुती उपाय

१६) पावसाळ्यात सर्दी – खोकला होणं सामान्य बाब आहे. अशा वेळी लगेचच डॉक्टरांकडे न जाता काही घरगुती उपाय करून पाहा.

१७) गरम दूधामध्ये हळद, सुंठ पावडर आणि मध घालून प्याल्यास सर्दी, खोकला आणि अंगदुखीपासून आराम मिळतो.

१८) चहा बनवताना त्यात तुळशीची पानं, आलं आणि काळीमिरी घाला. सर्दी-खोकल्यावर हा उत्तम उपाय आहे.

१९) आल्याचा रस आणि मध एक – एक चमचा सकाळी नि संध्याकाळी प्याल्यास सर्दी बरी होते.

२०) रोज थोडा खजूर खाऊन, त्यावर चार – पाच घोट गरम पाणी प्या. यामुळे कफ पातळ होऊन बाहेर पडतो. फुफ्फुसे साफ होतात आणि सर्दी खोकल्यापासून त्वरीत आराम मिळतो.

२१) गळा बसला असेल तर एक ग्लास गरम पाण्यामध्ये दीड चमचा मध घालून त्याने गुळण्या करा. लगेच आवाज सुटेल.

२२) गरम पाण्यामध्ये मीठ घालून त्याने गुळण्या केल्या तरी फायदेशीर ठरते.

२३) ओवा आणि साखर घालून उकळवलेले पाणी प्याल्यास घसा लगेच बरा होतो.