कुंद हवेतील केसांची निगा (M...

कुंद हवेतील केसांची निगा (Monsoon Haircare Tips)

बहुतेक लोकांना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात केस गळतीचा सामना करावा लागतो. वातावरणातील कुंद हवेमुळे केसांचं खूपच नुकसान होतं. पावसात भिजणे कधीकधी चांगले वाटते, परंतु प्रदूषण आणि पावसाचे पाणी एकत्र झाल्यास ते ॲसिडिक बनते आणि यामुळे केसांच्या त्वचेला नुकसान पोहोचते. याशिवाय अति आर्द्रता आणि उष्णतेमुळे देखील पुरुष आणि स्त्रिया दोघांचेही केस गळतात. पावसाळ्यात केसांच्या त्वचेला खाज सुटणे, केसांत कोंडा होणे, केस कोरडे होणे आणि केस गळणे अशा समस्यांची सुरुवात होते.
या कुंद हवेत घरच्या घरी आपल्या केसांचं संरक्षण कसं करावं, याबाबत एनरिच कंपनीच्या हेअर विभागाच्या आर्टिस्टीक हेड, सरीना आचार्य यांनी खालीलप्रमाणे टिप्स दिल्या आहेत. त्या म्हणतात, आपले केस आणि केसांची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी अधिक काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी –
१. पावसाळ्यात जास्त स्टायलिंग करणे टाळा – केस ताठ होतील अशी स्टायलिंग उत्पादने वापरणे टाळा. कारण यामुळे केस अधिक चिकट आणि निर्जिव होतात.
२. जास्त उष्णतेमुळे केसांना ताकद देणाऱ्या केराटिन प्रथिनांना हानी पोहोचू शकते, म्हणून सतत उष्णतेची साधने वापरणे टाळा. परंतु स्टाईल करण्यापूर्वी आपल्या केसांवर थर्मल हीट प्रोटेक्टर वापरणे विसरू नका.

३. उष्णतेच्या साधनांऐवजी काही ट्रेंडी स्टाईलची निवड करा – मध्यम ते लांब केसांसाठी, तुम्ही जलपरीप्रमाणे फिशटेल वेणी, हाय पोनीटेल आणि टॉपनॉट बन्स, केसांची लांबी लहान असल्यास सैल चिग्नॉन आणि छोट्या बन्सचा पर्याय निवडू शकता.
४. केसांची काळजी घेणारे काही डाय (DIY) वापरून पाहण्याची ही चांगली वेळ आहे, जी पावसाळ्याच्या दिवसांसाठी केसांना आर्द्रता मुक्त ठेवण्यास मदत करू शकते. केसांसाठी उपयुक्त असे काही डाय पाहूयात –
अ) मध आणि दही : त्वचा आणि केसांच्या समस्यांसाठी मध आणि दही हे दोन्ही घटक सहज उपलब्ध होतात. काही थेंब मधात दही मिसळा, ते केसांच्या मुळाशी आणि संपूर्ण केसांना समान प्रमाणात लावा. सुमारे अर्धा तास तसेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. चमकदार आणि सुंदर केस मिळवण्यासाठी आठवड्यातून एकदा ही कृती करा.

ब) नारळाचे तेल : बदाम किंवा ऑलिव्ह यांसारख्या काही अत्यावश्यक तेलांसोबत खोबरेल तेलाचा वापर करा. हे अधिक चिकट असले तरी खराब झालेल्या केसांवर उत्तम काम करते. एका छोट्या भांड्यात खोबरेल तेलासह इतर कोणतंही तेल मिक्स करा, थोडे गरम करा आणि हे मिश्रण तुमच्या टाळूवर समान रीतीने लावा. तुम्ही हा मास्क एक तास केसांवर ठेवू शकता आणि नंतर सौम्य शॅम्पू आणि कंडिशनरने धुवून टाका. त्यानंतर केसांना चांगले सीरम लावू शकता.

क) कोरफड : कोरफडचे असंख्य फायदे आहेत, हे आपण जाणतोच. केसांची चमक वाढवण्यासाठी कोरफड दही, खोबरेल तेल किंवा एरंडेल तेलात मिसळून लावता येते. सर्व प्रथम कोरफडीतून जेल काढा आणि त्यात खोबरेल तेल आणि मध मिसळा. कोरड्या टाळूला शांत करण्यासाठी हा प्रयोग करून पाहा. अर्धा तास तसेच राहू द्या. नंतर सौम्य शैम्पू आणि कंडिशनरने केस धुवा. मग केसांना चांगले सीरम लावा.