एकटे राहा, पण पैसेही राखा (Money Saving Tricks ...

एकटे राहा, पण पैसेही राखा (Money Saving Tricks For Single Person)

Money Saving Tricks For Single Person


वेगवेगळ्या कारणांनी एकटं जीवन जगण्याचा निर्णय घेणार्‍या व्यक्तींना भविष्याच्या तरतूदीसाठी बचत करण्याची गरज नसते, या व्यक्ती पैशांची जास्त प्रमाणात उधळपट्टी करतात, अशी त्यांच्याबाबत चुकीची विचारधारा असते. अशा व्यक्तींनी भले अनिर्बंध आयुष्य जगावं, मात्र आपलं अर्थकारणही जपावं. (Money Saving Tricks For Single Person)


लग्नाची बेडी नको, नवर्‍याचं बंधन नको अन् मुलांचं लोढणं नको, या भावनेनं एकटे राहण्याची फॅशन हल्ली तरुणाईमध्ये वाढली आहे. अनिर्बंध, बेबंद आयुष्य जगावं. आई-वडिलांचाही जाच (?) नको म्हणून आपलं घर सोडून वेगळं- एकटं राहावं या वृत्तीनं जगणारे बरेच तरुण-तरुणी आढळतात. काहींना करिअरच्या निमित्तानं आपल्या गावापासून दूर, महानगरांमध्ये एकटं राहावं लागतं. असं एकाकी जीवन जगणार्‍यांना खर्च जास्तीच येतात. ज्यांनी एकल आयुष्य काढायचं ठरवलं आहे, त्यांना तर भविष्याची चिंता नसते. काही अपवाद वगळता बाकी सर्व सिंगल मंडळी मिळवलेल्या पैशांची उधळपट्टी करतात. शॉपिंग, हॉटेलिंग यामध्ये पैसे उडवतात. बचत करण्याचा विचार नसतो.
जे लोक घरचे सधन असतात, त्यांना अर्थातच घरी पैसे पाठवायचे नसल्यानं ते बेछूट खर्च करतात. पुढचा विचार करत नाहीत…
पण ही विचारधारा चुकीची आहे. अनिर्बंध आयुष्य जगावं, मात्र आपलं अर्थकारण जपावं. वेळ, संकट काही सांगून येत नाही. अचानक काही आजारपण आलं किंवा अपघात झाला तर राखून ठेवलेले पैसे कामी येतील. कुटुंबातील जवळच्या व्यक्तीला अशाच कारणांनी पैशांची गरज लागली अन् त्याने मदत मागितली तर देता येईल, असा विचार असावा. तेव्हा सिंगल राहणार्‍यांनी, राहू इच्छिणार्‍यांनी आपले अर्थकारण कसे सांभाळावे, यासाठी काही टिप्स.
एकल जीवन म्हणजे पैशांची उधळपट्टी करण्याचा परवाना आपल्याला मिळाला आहे, ही भावना आधी मनातून काढून टाका. उलटपक्षी अगदी आवश्यक त्या गरजा पूर्ण करणे आणि भविष्यासाठी बचत करणे, ही आपली जबाबदारी आहे, ही भावना जोपासा. त्याची पहिली पायरी म्हणजे शॉपिंग. ऑनलाइन शॉपिंगच्या प्रलोभनांना बळी पडू नका. सेल, डिस्काउंट यांच्या भूलभुलैयात अडकू नका. दर महिन्याला ड्रेस, शूज, ज्वेलरी, कॉस्मेटिक्स खरेदी केलेच पाहिजेत, असं नाही. आवश्यक तेवढीच खरेदी करा. ड्रेस, ज्वेलरी हे खास दिवस जसे – वाढदिवस, सणवार असतील तेव्हा खरेदी करा. मोबाईल फोनच्या बाबतीत तेच सांगता येईल. नवा, काहीतरी आकर्षक पॅकेज देणारा फोन घेतलाच पाहिजे, असं काही नाही. त्याचा खरोखरीच आपल्याला काही उपयोग आहे का, ते ठरवून मगच विकत घ्या.

Money Saving Tricks For Single Person


दर महिन्याला वेगवेगळ्या कामासाठी होणार्‍या खर्चाची यादी बनवा. पगाराच्या दिवशी एका कागदावर किंवा डायरीवर किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये – मोबाईलमध्ये अशी यादी बनवा व त्यानुसार खर्च करा. याशिवाय दररोज होणार्‍या खर्चाची नोंद त्या डायरीत करा. महिन्याच्या शेवटी आलेल्या एकूण खर्चाचा आढावा घ्या. आपण खर्च किती करतो व बँकेत शिल्लक किती राहते,
त्याचा हिशेब करा. बँकेत पैसे कमी उरत असतील तर ते वाढवता कसे येतील, त्याचा विचार करा,
अन् पुढील महिन्यात तसे नियोजन करा.
आपली बचत दर महिन्यात वाढवली तर ती आपल्याच कामी येईल, हे लक्षात घ्या. बचतीच्या या पैशातून पुढे आपले स्वतःचे घर, वाहन घेता येईल. त्यासाठी कर्ज घेऊन व्याज भरण्याची व पुन्हा मुद्दल फेडण्याची गरज भासणार नाही.
दिवसेंदिवस आपली बचत वाढवा. बचतीच्या पैशांवर अधिक पैसे मिळवा. पैशांवर पैसे मिळविण्याची हुशारी दाखवा आणि श्रीमंत व्हा. म्हणजे बँकेतील पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवा. त्यावर जादा दराचे व्याज मिळवा. त्यासाठी खूप मोठी रक्कम जमा होण्याची वाट पाहण्याची गरज नाही. लाखभर रुपयांपासून सुरुवात करा. संसार चालविण्यासाठी पैसे पुरत नाहीत, म्हणून पूर्वीच्या काळी लोक पार्टटाईम जॉब करीत असत. तो प्रयोग करून पाहायला हरकत नाही. सिंगल
राहत असल्याने घरचे पाश नसतात. तेव्हा दिवसभराच्या नोकरीनंतर घरी धावत जाण्याजोगी परिस्थिती नसते. त्याचा लाभ उठवून मुख्य नोकरीनंतर संध्याकाळी 2 ते 3 तास पार्टटाईम
जॉब करा. किंवा हल्ली ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना वाढीस लागली असल्याने घरूनच करण्याचे काम मिळवा. संध्याकाळी घरी बसून काम करा आणि अधिक पैसे मिळवा.
सामाजिक प्रतिष्ठेपोटी खर्चाच्या मोहात पडू नका. उदाहरणार्थ वाहन खरेदी. कारण दोन चाकी किंवा
चार चाकी वाहन घेतले तर खर्च तिथेच थांबत नाही. ते चालविण्यासाठी पुढे पेट्रोल-डिझेल खर्च, सर्व्हिसिंग, दुरुस्ती-देखभाल यांचे खर्च असतात. ते खर्च भागवावेच लागतात. त्यात सवलत मिळत नसते. तीच गोष्ट आजारपण आणि औषधपाण्याची. त्यात सवलत मिळत नाही. तेव्हा असा प्रसंग कधीतरी येईल, याची तरतूद करून ठेवा