कोवळ्या मुलींना नग्न करून मिरवणूक काढली; पावसास...

कोवळ्या मुलींना नग्न करून मिरवणूक काढली; पावसासाठी भयंकर प्रकार (Minor Girl Paraded Naked To Please Rain God)

वरुणराजाची आराधना करण्यासाठी कोवळ्या मुलींना नग्न करून त्यांची मिरवणूक काढण्याचा भयंकर प्रकार मध्य प्रदेशात घडला आहे. बुंदेलखंड प्रांतातील दामोह जिल्ह्यापासून ५० किलो मीटर अंतरावरील आदिवासींच्या खेडेगावात हा अघोरी प्रकार घडला आहे. तिथे दुष्काळाची स्थिती आहे. पाऊस पडलेला नाही. हा पाऊस पडावा म्हणून देवाला प्रसन्न करण्यासाठी ही मिरवणूक काढली असल्याचे बोलले जाते.

या मिरवणुकीत ५ वर्षे वयाच्या ६ मुलींना नग्न करण्यात आले. त्यांच्या खांद्यावरील काठीला बेडूक बांधण्यात आला आणि वाजतगाजत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. या मुलींनी घरोघरी जाऊन भिक्षा मागितली. त्यांच्या सोबत बायकांचा एक गट भक्तीगीते गात जोगवा मागत होता. पीठ, डाळी, भात, कडधान्ये अशी स्वयंपाकाची सामग्री गावकऱ्यांनी मुलींना भिक्षेत दिली. ती गोळा करून एका देवळात त्याचा भंडारा लावण्यात आला.

त्या परिसरातील पीक पावसाअभावी सुकून चाललं आहे. म्हणून पाऊस पडण्यासाठी हा विधी निकड भासेल तेव्हा करण्याची त्या परिसरात प्रथा आहे, असा समग्र वृत्तांत इंडिया टुडेने दिला आहे. या भंडाऱ्याला सर्व गावकऱ्यांनी हजर राहिले पाहिजे, असा दंडक आहे. विशेष म्हणजे त्या कोवळ्या मुलींच्या घरातील माणसांच्या परवानगीने हा अघोरी प्रकार केला जातो आणि त्यांच्या नग्न मिरवणुकीत ही मंडळी सामील होतात. या अघोरी प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या प्रकाराची दखल घेऊन नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईटस्‌ या सरकारी संस्थेने या प्रकरणाचा अहवाल मागितला आहे. दामोह जिल्ह्याचे कलेक्टर तो पाठविणार आहेत. मात्र तेथील पोलिसांचे असे म्हणणे आहे की, मुलींच्या घरातील लोकांच्या पुढाकाराने ही स्थानिक प्रथा पाळली जाते. व याविरुद्ध कुणीही पोलिसात तक्रार केलेली नाही. परंतु आजच्या पुढारलेल्या जगात ही अंधश्रद्धा जोपासली जाते, हे अशोभनीय आहे.