अल्पवयीन मूक-बधीर मुलींना विवस्त्र करून दौडविले...

अल्पवयीन मूक-बधीर मुलींना विवस्त्र करून दौडविले, मारझोड व बलात्कार : छत्तीसगड मधील भयंकर घटना (Minor Deaf – Mute Girls Chased Naked And Raped : Terrible Incidence In Chhattisgarh)

अनाथ, निराधार अल्पवयीन मूक-बधीर मुलींना विवस्त्र करून दौडविण्याचा व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा महाभयंकर प्रकार छत्तीसगड राज्यातील जशपूर गावात घडला आहे. १३ ते १७ वयोगटातील या मूली असून त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून, विवस्त्र करून अत्याचार करण्यात आले. द शेल्टर या शासन संचालित आश्रयगृहामध्ये २२ सप्टेंबरच्या मध्यरात्री हा प्रकार घडला. ते करणारे दोघे जण असून त्यापैकी एक या संस्थेचा केअरटेकर राजेश राम व दुसरा वॉचमन नरेन्द्र भगत आहे.

या दोन्ही नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे ज्या संस्थेत ही लाजिरवाणी घटना घडली ती पोलिस स्टेशनपासून फक्त १०० मीटर अंतरावर आहे. तर जशपूर कलेक्टर ऑफिस तिथून फक्त ५० मीटर अंतरावर आहे.

हा अत्यंत निर्दयी हल्लाबोल थोपविण्याचा अयशस्वी प्रयत्न संस्थेतील एका महिला केअरटेकरने केला. तेव्हा तिला त्या दोन दुष्टांनी खोलीत कोंडून ठेवले.

अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रतिभा पांडे यांना खबर मिळताच, त्या घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी सांगितले की, या दुर्दैवी मुलींना जबर धक्का बसला आहे. त्या जखमी आहेत. त्यांना बोलता येत नसल्याने त्यांची खाणाखुणांची भाषा समजायला पोलिसांना वेळ लागला. पण कळताच पोलिसांना देखील धक्का बसला आहे. विवस्त्र करून मुलींना दौडविण्यात आले, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला, जबर मारहाण करण्यात आली आहे. तसेच १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केलेला आहे. या घटनेने छत्तीसगड राज्यात खळबळ माजली आहे.