मायावी दुनियेतील चटका लावणार्या कथा (Mind Blowi...

मायावी दुनियेतील चटका लावणार्या कथा (Mind Blowing True Stories Of Bollywood)

‘साठवणीतील आठवणी’ या पुस्तकाद्वारे प्रसिद्धीस पावलेले चित्रसृष्टीतील प्रथितयश चित्रकार आणि पोस्टर्स डिझायनर श्रीकांत धोंगडे यांचे ‘कुरतडलेल्या कथा’ हे काळजाचा ठाव घेणारं पुस्तक प्रकाशित झालं आहे.
आपल्या व्यवसायानिमित्त श्रीकांतजींना चित्रसृष्टीतील अनेक मान्यवरांचा सहवास लाभला. त्यांचे स्वभाव जाणून घेता आले. अंतरंग कळले. ते लेखनात नेमकेपणाने मांडण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. त्याची प्रचिती या नवीन दर्दभर्‍या कथांमधून येते. काळीज कुरतडणारं सत्य दाखवणार्‍या या अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक कथा आहेत. सिनेमाच्या या मोहमयी, मायावी दुनियेतील शोककथा श्रीकांतजींनी अत्यंत प्रभावीपणे मांडल्या आहेत. विशेषतः ‘एक खोटं लपवताना’, ‘कॉलगर्ल’ या दोन कथांच्या बाबतीत हे म्हणता येईल. त्या काल्पनिक कथा आहेत, असं लेखक म्हणतात. ते मान्य केलं तर या लेखकाच्या कल्पनेची भरारी विलक्षण आहे. कसबी कादंबरीकार किंवा प्रभावी पटकथा लेखक ज्या पद्धतीने लिहील, त्याप्रमाणे हे लेखन घडले आहे. काळजाला चटका लावतील अशा या कथा वाचून वाचक अंतर्मुख झाल्याशिवाय राहणार नाही.

Blowing True Stories Of Bollywood

सोप्या शब्दात मोठा आशय
कल्पितापेक्षा सत्य अद्भुत असतं, अशी म्हण आहे. त्याची प्रचिती देणार्‍या सत्यकथा देखील श्रीकांतजींनी या पुस्तकात दिल्या आहेत. ‘गूढ गुलाबाचे अश्रू’ आणि ‘अतृप्ता मीनाकुमारीफ या सत्यकथांनी दोन अभिनेत्रींच्या जीवनातील अप्रकाशित घटना त्यांनी प्रभावीपणे मांडल्या आहेत. अल्पकाळ चित्रसृष्टीतील तारांगणावर चमकलेली एक आरस्पानी सौंदर्याची तर दुसरी अभिजात अभिनयाची मल्लिका यांच्या या सत्यकथा खरोखरीच काळीज कुरतडतात. मीनाकुमारी विषयी श्रीकांतजींनी किती प्रेमाने, उत्कटतेने व श्रद्धेने लिहिलं आहे, ते वाचल्याशिवाय कळणार नाही.
‘गुरुदत्त : एक अशांत वादळ’ या कथेच्या आरंभालाच ते म्हणतात की, ‘त्याला जाऊन 57 वर्षे उलटली तरी प्रसिद्धीचं वर्तुळ पुसट होण्याऐवजी जास्तच गडद होत चाललं आहे.’ किती सोप्या शब्दात केवढा मोठा आशय त्यांनी मांडला आहे, ते पाहा. ‘चार कोनांचा त्रिकोण’, ‘होरपळ’ या कथांमधून लेखक अनमोल माहिती पुरवतो.
मनोरंजन क्षेत्रातील काळीज कुरतडणार्‍या या कथांना समर्पक असे प्रास्ताविक आणि त्यांचा हातखंडा असलेली रेखाटने आणि मुखपृष्ठ गुंग करून टाकणारी आहेत. कॉन्टिनेण्टल प्रकाशन या प्रथितयश प्रकाशन संस्थेनं हे पुस्तक प्रकाशित करून अभिजात साहित्य संपदेत मोलाची भर टाकली आहे.
कुरतडलेल्या कथा
लेखक : श्रीकांत धोंगडे
प्रकाशक : कॉन्टिनेण्टल प्रकाशन, पुणे
पाने : 216
मूल्य : 200 रुपये