‘झुमका गिरा रे’ या गाण्याचे बरेली शहरात स्मारक ...

‘झुमका गिरा रे’ या गाण्याचे बरेली शहरात स्मारक : ‘मेरा साया’ चित्रपटातील गाण्याने इतिहास घडवला (Memorial Of ‘Jhumka’ From The Song Of ‘Jhumka Gira Re’ Is Tourist’s Attraction In Bareli)

राज खोसला यांनी दिग्दर्शित केलेला ‘मेरा साया’ हा रहस्यपट खूप गाजला होता. सुनील दत्त आणि साधना या जोडीच्या चित्रपटातील गाणी तितकीच गाजली. त्यापैकी ‘तु जहां जहां चलेगा, मेरा साया साथ होगा’, ‘झुमका गिरा रे, बरेली के बाजार में’ ही गाणी विशेष गाजली. झुमक्याचे गाणे आशा भोसले यांनी गायले असून राजा मेहंदी अली खान यांच्या गीतांवर मदन मोहन यांनी स्वरसाज चढविला आहे.

‘झुमका गिरा रे’ हे साधना वर चित्रित झालेले उडते गाणे आजही रेडिओवर वाजते. या गाण्यामुळे उत्तर प्रदेशातील बरेली हे शहर संपूर्ण देशात प्रसिद्धीला आले. ‘मेरा साया’ सिनेमातील या गाण्याचा बरेलीशी काहीही संबंध नाही. तरी पण गाण्याची लोकप्रियता पाहून बरेली विकास प्राधिकरणाने शहरातील एनएच २४ वरील (अर्थात हायवे वर) झिरो पॉईंट येथे या वर्षी एक झुमका उभा केला आहे. पितळ आणि तांब्याचा बनविण्यात आलेला हा झुमका (अर्थात्‌ कानातील डूल) २०० किलो वजनाचा असून १४ फूट एवढ्या उंचीचा आहे. तो बनविण्यासाठी १८ लाख रुपये खर्च आला आहे.

झुमक्याचे हे स्मारक ज्या ठिकाणी उभारण्यात आले आहे, त्याचे नाव आहे ‘झुमका तिराहा’. ‘मेरा साया’ हा चित्रपट १९६६ साली आला होता. त्यातील गाण्याचे स्मारक ५४ वर्षांनी उभारण्यात आले आहे. अन्‌ ते पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.

‘मेरा साया’ हा ‘पाठलाग’ या मराठी सिनेमावरून बेतण्यात आला होता. मराठी चित्रपटात डॉ. काशिनाथ घाणेकर, भावना ही जोडी होती. ‘पाठलाग’चे दिग्दर्शन राजा परांजपे यांनी केले होते.