‘गंगूबाई’ आलिया भट्ट नव्हे, तर टेलि...

‘गंगूबाई’ आलिया भट्ट नव्हे, तर टेलिव्हिजनवरील छोटी ‘गंगूबाई’ सलोनी आता झालीय मोठी आणि सुंदर ( Meet TV’s ‘Gangubai’ Saloni, Who is Grown Up Now And Looks Stunning)

आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट बऱ्याच अडथळ्यांना पार करत उद्या म्हणजेच २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि अनेक गाणी आधीच प्रदर्शित झाली असून आलियाच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना ती खूप आवडली आहेत, पण आज आपण मोठ्या पडद्याच्या गंगूबाईबद्दल बोलत नाही आहोत. आज आपण टेलिव्हिजनच्या छोट्या ‘गंगुबाई’ सलोनीबद्दल बोलणार आहोत, जी आता मोठी तर झालीच आहे शिवाय सुंदरही दिसतेय. तिचे आत्ताचे फोटो पाहिले तर तिला ओळखताही येणार नाही.

टेलिव्हिजनवर प्रसारित होणाऱ्या कॉमेडी सर्कस, या शोमध्ये ही छोटी गंगूबाई खूप गाजली होती. गंगूबाईच्या भूमिकेतील सलोनीने कधी नवज्योत सिद्धू, कधी छोटी भारती सिंग, कधी सोनिया गांधी तर कधी इतर काही भूमिका करत लोंकाना पोट धरून हसवले आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात तिने आपल्या टॅलेंटच्या जोरावर टेलिव्हिजनवर आपला ठसा तर उमटवलाच अन्‌ प्रेक्षकांचे मनोरंजनही केलेले आहे. पण आता अनेक वर्षांपासून सलोनी टीव्हीपासून गायब आहे. ती कुठे आहे, काय करते आणि आता ती कशी दिसते, ते जाणून घेऊया.

अनेक दिवस गायब असलेली सलोनी इतकी मोठी झाली आहे की या मोठ्या सलोनीला ओळखताच येणार नाही. सलोनी आता २० वर्षांची आहे आणि आपण पाहिलेली लहान सलोनी तेव्हा फक्त ७ वर्षांची होती. परंतु, लहानपणी गुबगुबीत दिसणारी सलोनी आता एकदम स्लिम झाली आहे. लॉकडाऊनमध्ये तिने २२ किलो वजन कमी केले आणि आता ती खूप सुंदर दिसत आहे.

सलोनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचं इंस्टाग्राम अकाउंट तिच्या ग्लॅमरस आणि सुंदर फोटोंनी भरलेलं आहे. टेलिव्हिजनवरील तिचे कलाकार मित्र तिच्या प्रत्येक पोस्टवर कमेंट करताना दिसतात. चाहत्यांकडूनही तिच्या पोस्टना जबरदस्त प्रतिसाद दिला जातो. लहान वयात मोठी लोकप्रियता मिळवणारी व आपल्या गमतीशीर अभिनयाने सगळ्यांचं मन जिंकणारी सलोनी अभिनयामध्ये करिअर करू इच्छित नसून ती डायरेक्टर बनू इच्छिते.

सलोनी १९ जून २००१ साली महाराष्ट्रातील सांगली येथे जन्मली आहे. सलोनी प्राण्यांवर जिवापाड प्रेम करते. तिच्या घरी कुत्रा पाळलेला आहे, त्याच्यासोबत ती तिचा वेळ घालवते. तिला तिखट पदार्थ खायला आवडतात. सलोनी उर्फ ​​गंगूबाई हिने अनेक टीव्ही शोमध्येही काम केले आहे. तसेच तिने काही मराठी टीव्ही कार्यक्रम आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. सलोनी ‘छोटे मियाँ और बडे मियाँ’ या कॉमेडी शोचीही विजेती ठरली आहे. शाहरुख खानच्या ‘क्या आप पांचवी पास से तेज हैं’ या शोच्या प्रोमोमध्येही ती दिसली होती. या व्यतिरिक्त सलोनीने टेढ़ी-मेढ़ी फॅमिली, बड़े भैया की दुल्हनिया, नमूने आणि ये जादू है जिन्न का अशा सिरियल्समधूनही काम केलेले आहे.