औषधी गुणधर्माचे अळू (Medical properties of a gr...

औषधी गुणधर्माचे अळू (Medical properties of a green vegetables)

अळू ही स्वस्त आणि मुबलक प्रमाणात मिळणारी वनस्पती आहे. वर्षभर अगदी आपल्या परसातही सहजपणे मिळणार्‍या या पालेभाजीच्या अंगी अनेक औषधी गुणधर्म आहेत.

अळू ही मूळची रानभाजी. ती रानावनात आपोआप उगवत असे. हळूहळू तिचा खाण्यासाठी वापर होऊ लागला. आता भारतातल्या बहुसंख्य राज्यात अळू खाल्ला जातो. एवढंच नव्हे तर, अळूचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. मुंडले अळू, काळे अळू, झाडावर वाढणारे अळू, रान अळू असे अळूचे अनेक प्रकार आहेत. काही जातींच्या अळूला खाज असते. ज्या अळूच्या पानांचे दांडे आणि देठ काळपट रंगाचे असतात, ती पानं अळुवडीसाठी वापरतात.

–    अळू हे थंड, भूक वाढवणारं आणि मलमूत्र स्वच्छ करण्यास मदत करणारं आहे.

–    बाळंत स्त्रीला दूध येण्यासाठी अळूची भाजी द्यावी. तिने अळू आणि मेथी यांची मिश्र भाजी रोज खाल्ल्यास भरपूर आणि सकस दूध येतं. नुसत्या अळूचा आहारात उपयोग केला, तरी फायदा होतो.

–    अळूची भाजी रक्तवर्धक आहे.

–    अळूची देठं जाळून त्याची राख खोबरेल तेलातून फोडावर लावल्यास फोड फुटतो.

–    गांधीलमाशी किंवा इतर विषारी कीटक चावला, तर अळू फुफाट्यात भाजून त्याचा रस पोटात घ्यावा आणि दंशस्थानीसुद्धा लावावा.

–    झाडावरील अळूच्या (राजाळू) ताज्या मुळ्या भाजून, त्या बारीक वाटून लहानशा सुपारीएवढी गोळी करून पोटात घ्यावी आणि वर गरम पाणी प्यावं. रोज असं घेतल्यास कोळ्याचं विष उतरतं.

–    रोगाळू (झाडावर उगवलेले) अळूचा कांदा शिळ्या पाण्यात उगाळून त्याचा गंडमाळेवर लेप दिल्यास, ती बरी होते.