माझी तुझी रेशीमगाठ मालिका लोकाग्रहास्तव पुन्हा ...

माझी तुझी रेशीमगाठ मालिका लोकाग्रहास्तव पुन्हा सुरु होणार (Mazi Tuzi Reshimgath Serial To Continue On Public Demand)

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील प्रत्येक पात्राला खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेनिमित्त प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांसारख्या चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या कलाकारांची जोडी पाहायला मिळाली. या मालिकेतील प्रमुख आकर्षण होते ती छोटी परी म्हणजेच बालकलाकार मायका वायकुळ. मालिकेची कथाही थोडी वेगळी असल्यामुळे प्रेक्षकांना खूप भावली होती.

समीर – यशची मैत्री पाहून आपल्यापण आयुष्यात असा मित्र असावा अशी भावना प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. पण अशातच अचानक वाहिनीने रात्री साडेआठच्या स्लॉटला दार उघड बये दार उघड ही नवी मालिका सुरु होणार असल्याचे जाहिर केले. तसेच माझी तुझी रेशीमगाठच्या कलाकारांनीसुद्धा त्यांच्या शेवटच्या दिवसाचे शूट झाले असल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना कळवले.

आपली आवडती मालिका लवकरच निरोप घेणार, आपली आवडती पात्र आता टीव्हीवर पाहायला मिळणार ही गोष्ट प्रेक्षकांच्या पचनी पडली नाही. त्यामुळे मालिका बंद होण्याबाबत सोशल मीडियावर सर्वत्र नाराजीचे सूर उमटू लागले.

डोन्ट ऑफ एअर माझी तुझी रेशीमगाठ ही मागणी सोशल मीडियावर इतकी ट्रेण्डींग झाली की, प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावरील मागणी लक्षात घेता वाहिनीने ही मालिका पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच या मालिकेचे शूटींग आजपासून पुन्हा सुरु होणार आहे. याबाबतची अधिकृत पोस्ट चॅनलकडून करण्यात आली असून त्यात ही रेशीमगाठ तुटायची नाय…असे लिहिले आहे. पण या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. 19 सप्टेंबरपासून ही मालिका आता रात्री साडेआठ ऐवजी सांयकाळी साडेसहा वाजता प्रसारित होईल.

मालिका पुन्हा सुरु होणार असल्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा खूप आनंद झाला आहे.

फोटो सौजन्य- सोशल मीडिया