लहान वयात घटस्फोट आणि ३ मुलांची आई झालेली कनिका...

लहान वयात घटस्फोट आणि ३ मुलांची आई झालेली कनिका कपूर, दुसऱ्या लग्नाच्या तयारीत (Married At The Age Of 18, Got Divorced From Her first Husband And Single Mom Of 3 Kids Kanika kapoor is Tying The Knot Again)

ब्लॉकबस्टर बेबी डॉल हे गाणं गाऊन बॉलिवूडमध्ये तसेच लाखो-करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी गायिका कनिका कपूर सध्या तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. लहान वयात घटस्फोट आणि ३ मुलांची आई झालेली कनिका कपूर यावर्षी मे महिन्यात दुसरं लग्न करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिचा होणारा पती हा लंडन येथील एक एनआरआई बिजनसमॅन आहे.

कनिका कपूरच्या होणाऱ्या पतीचं नाव गौतम असून ते दोघं एकमेकांना जवळपास एक वर्षांपासून डेट करत आहेत. कनिका आता ४३ वर्षांची असून हे तिचं दुसरं लग्न आहे. वयाच्या १८व्या वर्षी पहिलं लग्न, घटस्फोट आणि तीन मुलांचे एकट्याने संगोपन करणारी कनिका एके काळी जीवनाला कंटाळून आत्महत्या करणार होती.

लहान वयात कनिकाला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं, याबाबतचा खुलासा तिने एका मुलाखतीमध्ये केला होता, ज्यात तिने तिचं खाजगी आयुष्य, लग्न आणि मुलांबद्दल मोकळेपणाने बातचीत केली. ‘१८ वर्षांची असताना कनिकाने लंडन येथील बिझनेसमॅन राज चंडोक याच्यासोबत लग्न केलं आणि लग्नानंतर ती लंडनला गेली. त्यावेळेस ‘मी टिपिकल हाऊस वाइफ होती, मला तीन मुलं होती आणि मी माझ्या आयुष्यात अतिशय आनंदी होती, परंतु २०१२ मध्ये आमचा घटस्फोट झाला. मी वाद घातला नाही. मी स्वतःला या नात्यापासून दूर केले. बऱ्याचशा बायका विस्कटलेला संसारही करत राहतात, परंतु तसं करणं माझ्यासाठी अवघड होतं, म्हणूनच मी या सगळ्यापासून दूर निघून गेले.’ २०व्या वर्षी मी खूप काही झेलले होते.  

कनिकाने आपल्या खाजगी जीवनातील दुःख सांगताना म्हटले होते, ‘मी लहान वयात पत्नी झाले, त्यानंतर लहान वयातच सिंगल मदर बनले. लहान वयात माझ्यावर मोठी जबाबदारी पडली होती. लंडनमध्ये एकटे राहून तीन मुलांचे पालन-पोषण करणं माझ्यासाठी कठीण होतं. परंतु मी दररोज देवाचे आभार मानते की त्याने मला आयुष्यात पुढे जाण्यास मदत केली. मला जगण्याची हिंमत दिली.

आपल्या जीवनातील वाईट दिवसांबद्दल बोलताना कनिकाने सांगितलं की, तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. ‘त्यावेळेस मी जीवनास घाबरले होते. माझ्याकडे पैसे नव्हते. आम्हा पती-पत्नीच्या नात्यात कटुता आली होती. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. माझे वकील माझ्यावर दबाव आणत होते. तीन मुलं माझ्या पदरात होती. मुलांना फी न भरल्यामुळे शाळेतून काढून टाकले होते. एवढं सगळं होत असताना जीवनात काही शिल्लक राहिलेलं नाही, असं वाटत होतं. परंतु माझ्या सोबत माझी आई, माझे भाऊ आणि मित्र-मैत्रिणी होते, ज्यांनी मला या सगळ्यातून बाहेर पडण्यास मदत केली.’

घटस्फोटानंतर कनिकाने आपल्या म्युजिक करिअरवर लक्ष देण्यास सुरुवात केली आणि त्यात ती यशस्वी झाली. आता घटस्फोटाच्या १८ वर्षांनंतर वयाच्या ४३व्या वर्षी कनिकाने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अजून तारीख नक्की झाली नसली तरी बातमीनुसार या वर्षीच मे महिन्यात लंडन येथे हे लग्न होईल. त्यांनी लग्नाची तयारी सुरू केली आहे.