दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या : खरेदीला उत्साहाचे...

दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या : खरेदीला उत्साहाचे उधाण (Markets Crowded On The Occassion Of Diwali : Shopping In Full Swing)

करोनाच्या साथीमुळे गेल्या वर्षीची दिवाळी फारशी आनंदात गेली नव्हती. परंतु लसीकरणाच्या प्रभावामुळे आता ही साथ बऱ्यापैकी आटोक्यात आल्याने यंदाची दिवाळी लोक दुप्पट आनंदाने साजरी करण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. याची प्रचिती कालचा रविवार आणि परवाच्या शनिवारी दिसून आली. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर येथील बाजारपेठा खूपच सजल्या असून लोकांच्या खरेदीला उत्साहाचे उधाण आले आहे.

कपडे, आकाश कंदिल, रांगोळ्या, मिठाई, सुकामेवा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, तोरण, फुले यांच्या दुकानात लोकांची झुंबड दिसून आली. मुख्य शहरांमधील महत्त्वाच्या बाजारपेठांमधून लोकांनी सामाजिक अंतराचे भान न ठेवता मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तोंडांवर मास्क तेवढे दिसत होते.

नागपूरमध्ये तर गेल्या २ वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक सोने खरेदी झाली.

दीड वर्षानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असल्याने व्यापारी वर्ग खुशीत दिसत होता. लहानमोठी दुकाने, मॉल्स्‌ यांनी रंगीबेरंगी इलेक्ट्रीक माळांची रोषणाई व आकर्षक सजावटीने आपली आस्थापने सुशोभित केली आहेत. काही मॉल्स्‌मधून ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या योजना चालू आहेत.

या संदर्भात ठाणे येथील विवियाना मॉलमध्ये केलेली सजावट आणि ‘शॉप ॲन्ड विन’ या स्कीमला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. या मॉलने आपल्या आवारात आणि पार्किंगच्या जागेत आकर्षक आकाश कंदिल आणि रंगीबेरंगी एलईडी लाईटस्‌ लावले आहेत.

तसेच ‘शॉप ॲन्ड विन’ ही ऑफर दिवाळी दरम्यान सुरू आहे. यामध्ये २ हजार रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांपैकी २ ग्राहकांना दररोज २५०० रुपयांचे बम्पर व्हाऊचर जिंकता येईल. शिवाय शनिवार आणि रविवारी एका भाग्यवान ग्राहकाला ॲपल आयफोन १३ जिंकण्याची संधी मिळणार आहे.

कालच्या वीकएन्डला सदर मॉलमध्ये खरेदीची झुंबड उडाली होती. आणि विजेत्या ग्राहकांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.